आजच्या विश्वासदर्शक ठरावापूर्वी नारायणसामी सरकार संकटात
@ पाँडिचेरी / वृत्तसंस्था
पाँडिचेरीत नायब राज्यपालांच्या आदेशानुसार सोमवारी विश्वासदर्शक ठराव होणार असतानाच आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्याने नारायणसामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे संख्याबळ आणखी घटले आहे. काँग्रेसचे आमदार के. लक्ष्मीनारायणन आणि दमुक आमदार व्यंकटेशन यांनी रविवारी राजीनामा दिला. दोघांनीही विधानसभा अध्यक्ष व्ही. पी. सिवाकोलुंधू यांच्या निवासस्थानी जाऊन राजीनामापत्र सादर केले. दोघांच्या राजीनाम्यामुळे आता सरकारचे संख्याबळ 11 पर्यंत खाली आले आहे. सोमवारी विधानसभेमध्ये विश्वादर्शक ठराव मांडला जाणार असून तो जिंकण्याचे आव्हान मुख्यमंत्री नारायणसामी यांच्यासमोर आहे.
मुख्यमंत्री नारायणसामी यांच्या गटातील चार आमदारांनी मागील आठवडय़ात राजीनामा दिला होता. त्यानंतर आणखी दोन आमदार बाहेर पडल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे. 33 सदस्य असलेल्या पाँडिचेरी विधानसभेत आता सत्ताधारी पक्षाकडे 11 तर विरोधकांकडे 14 आमदार आहेत. सात जागा सध्या रिक्त आहेत. नारायणसामी यांचे सरकार अल्पमतात आल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री नारायणसामी यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला असला तरी प्रभारी नायब राज्यपाल तिमिलिसाई सौंदरराजन यांनी त्यांना येत्या सोमवारी, 22 फेब्रुवारी रोजी विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. पाँडिचेरी विधानसभा निवडणूक येत्या काही महिन्यात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
मागील आठवडय़ात पाँडिचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना तात्काळ प्रभावाने हटवण्याचे आदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्यानंतर तेथील अतिरिक्त पदभार तेलंगणाचे राज्यपाल तिमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मागील काही काळापासून किरण बेदी आणि मुख्यमंत्री नारायणसामी यांच्यामध्ये सुरू असणाऱया वादाचा परिणाम आता पाहायला मिळत आहे. नायब राज्यपालपदी कार्यरत असताना किरण बेदींचे पाँडिचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांच्याशी मोठय़ा प्रमाणात मतभेद निर्माण झाले होते.









