बॅरिकेड्समुळे नागरिकांचे प्रचंड हाल, वाहतूक समस्येमुळे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट

प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारी थोपविण्यासाठी राज्य सरकारने अचानक विकेंड कर्फ्यूची घोषणा केली आहे. महाराष्ट्र, केरळच्या सीमेवरील बेळगावसह आठ जिल्हय़ात विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. कर्फ्यूचेनिमित्त साधून पोलिसांनी सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे धोरण अवलंबिले आहे. दुपारपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू असल्या तरी रस्त्यावर बॅरिकेड्स उभे करून अत्यावश्यक सेवेसाठीही नागरिकांनी पायीही बाहेर पडू नये, अशीच व्यूहरचना पोलिसांनी केली आहे. पोलिसांच्या या अनागेंदी कारभारामुळे जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पोलीस दल असो किंवा इतर कोणतेही सरकारी खाते असो, नागरिकांच्या हिताचा विचार करून त्यांना सेवा पुरविण्याची जबाबदारी अधिकाऱयांवर असते. मात्र, बेळगाव येथे आपण नागरिकांच्या सेवेसाठी आलो आहोत, याचा अधिकाऱयांना विसर पडला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विकेंड कर्फ्यू जारी होताच ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभे करून रस्ते अडविण्यात आले आहेत. टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वेगेटचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे.

या परिसरातील नागरिकांच्या सोयीपेक्षा त्यांच्या गैरसोयीत कशी भर पडेल, याची व्यवस्था पोलीस अधिकाऱयांनी केली आहे. रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स उभे करून हा रस्ता अडविण्यात आला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे बॅरिकेड्स उभे करताना किमान पादचाऱयांचाही विचार झालेला नाही. पहिल्या रेल्वेगेटमार्गे गोवावेस सर्कलकडे जाणाऱयांना एकतर दुसऱया रेल्वेगेटवरून नाहीतर ओव्हरब्रिजवरून वळसा घालावा लागत आहे. पेट्रोलचा भाव वाढलेला असताना थोडय़ाशा अंतरासाठी एक-दोन किलोमीटरचे अंतर कापावे लागत आहे. ही वाहनधारकांची कथा. तर पादचाऱयांचा कोणी विचारच केला नाही, असे दिसून येते.
भाजीपाला, दूध, औषधे आदी अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर पडणाऱया पादचाऱयांना ओलांडता यावे असे मार्ग ठेवले नाहीत. त्यामुळे त्यांनाही जास्तीची पायपीट करावी लागते. अत्यंत अशास्त्राrयरीत्या पोलीस दलाने बॅरिकेड्स घालून नागरिकांना वेठीस धरले आहे. रविवारी सकाळपासून पादचारी, महिला, वृद्ध आणि सायकलस्वारांना अनेक कसरती करून रेल्वेगेट ओलांडावे लागत होते. त्यासाठी धोकादायक अडथळे पार करावे लागले.

मंगळवार पेठ, गवळी गल्ली येथे गवळी समाजाचे मोठय़ा प्रमाणात वास्तव्य आहे. या गवळी बांधवांच्या म्हशींना चारण्यासाठी पहिले रेल्वेगेट ओलांडून व्हॅक्सिन डेपो, फायरिंग बट्ट, मंडोळी रोड, भवानीनगर परिसरात घेऊन जावे लागते. मात्र, रेल्वेगेट दोन्ही बाजूंनी बंद केल्यामुळे मुक्मया जनावरांना सोडणेही अवघड झाले आहे. रेल्वेरुळाभोवती भिंत उभी करण्याचे कामही सुरू आहे. पहिले रेल्वेगेट दोन्ही बाजूंनी बंद केल्यामुळे दुसऱया व तिसऱया गेटवर वाहतुकीचा ताण वाढला आहे.
पोलीस आयुक्त म्हणतात…
पहिले रेल्वेगेट दोन्ही बाजूंनी बंद केल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या निदर्शनास आणून दिली असता, सध्या विकेंड कर्फ्यू आहे. नागरिकांनी बाहेर पडायचेच कशाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर दुपारी दोनपर्यंत अत्यावश्यक सेवांसाठी मुभा आहे. त्यामुळे दूध, औषधे खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडणाऱयांनी कसे यावे, असा प्रश्न उपस्थित केला असता, ‘कर्फ्यू आहे, तेव्हा मनाला थोडा आवर घालून कळ सोसा’ असा सल्लाही त्यांनी दिला.









