न्यूझीलंडविरुद्ध दुसरी कसोटी : इर्वीचे दमदार शतक, मॅरक्रम-एल्गरची फटकेबाजी
ख्राईस्टचर्च / वृत्तसंस्था
एडन मॅरक्रम व सरेल इर्वी यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर 3 बाद 238 धावांपर्यंत मजल मारली. हॅग्ले ओव्हल येथे सुरु असलेल्या या लढतीत तेम्बा बवूमा व रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन नाबाद राहिले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर सलामीवीर डीन एल्गार व इर्वी यांनी शतकी भागीदारी साकारत द. आफ्रिकेला भक्कम सुरुवात करुन दिली. या जोडीने 111 धावांची सलामी दिली. दक्षिण आफ्रिकन कर्णधार एल्गारला टीम साऊदीने 41 धावांवर बाद केले. नंतर इर्वीच्या साथीला मॅरक्रम क्रीझवर आला आणि या जोडीने फटकेबाजीवर आणखी भर दिला.
पुढे, नील वॅग्नरने मॅरक्रमला 42 धावांवर बाद केले तर इर्वीला मॅट हेन्रीने तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी दक्षिण आफ्रिकेची स्थिती 3 बाद 199 अशी होती. नंतर बवुमा व डय़ुसेन यांनी आणखी पडझड होऊ न देता संघाला दिवसअखेर 3 बाद 238 अशी स्थिती प्राप्त करुन दिली.
संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका पहिला डाव ः 3 बाद 238 (सरेल इर्वी 221 चेंडूत 14 चौकारांसह 108, एडन मॅरक्रम 103 चेंडूत 42, एल्गर 101 चेंडूत 41. टीम साऊदी 1-41, हेन्री 1-65, वॅग्नर 1-50).









