पहिली कसोटी पहिला दिवस : लॅथमचे अर्धशतक, विल्यम्सन शतकासमीप
वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
कर्णधार केन विल्यम्सन व टॉम लॅथम यांच्या शानदार अर्धशतकांमुळे न्यूझीलंडने विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 2 बाद 243 अशी मजबूत स्थिती प्राप्त केली. विल्यम्सन शतकाच्या उंबरठय़ावर असून तो 97 धावांवर खेळत आहे. रॉस टेलर 31 धावा काढून त्याला साथ देत आहे. लॅथमने 86 धावा जमविताना विल्यम्सनसमवेत दुसऱया गडय़ासाठी 154 धावांची भागीदारी केली.
हिरवळयुक्त सेडॉन पार्कची खेळपट्टी पाहून दोन्ही संघांनी फिरकी गोलंदाजांना वगळून वेगवान गोलंदाजांवरच भरवसा ठेवण्याचा निर्णय घेतला. होल्डरने नाणेफेक जिंकली तेव्हा तो न्यूझीलंडलाच प्रथम फलंदाजी देणार याची अपेक्षाच होती. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन तास उशिरा खेळ सुरू झाला. खेळपट्टी वेग, बाऊन्स, स्विंग गोलंदाजीसाठी अनुकूल होती. पण विंडीजला त्याचा फायदा घेता आला नाही. दिवसभर रगडून त्यांना केवळ दोन बळी मिळवण्यावर समाधान मानावे लागले. खेळ संपण्याच्या सुमारास विंडीजला आणखी एक धक्का बसला. फॉर्ममध्ये असलेला त्यांचा फलंदाज डॅरेन ब्रॅव्होच्या घोटय़ाला दुखापत झाल्याने त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.
पदार्पणवीर विल यंगला शॅनन गॅब्रिएलने चौथ्याच षटकात 5 धावांवर बाद करून विंडीजला चांगली सुरुवात करून दिली होती. पण दुसरा बळी मिळविण्यासाठी त्यांना तब्बल 51 षटके प्रतीक्षा करावी लागली. विल्यम्सन व लॅथम यांनी संयमी खेळ करीत खराब चेंडूची प्रतीक्षा करून धावफलक हलता ठेवला. गॅब्रिएल, केमार रोश, होल्डर यांच्या लाईनमध्ये सातत्य नव्हते आणि क्वचित मिळालेल्या संधी क्षेत्ररक्षकांच्या चुकांमुळे वाया गेल्या. उंचीचा लाभ घेत होल्डरने बाऊन्स मिळविण्याचा प्रयत्न केला. पण विल्यम्सन-लॅथम यांनी कोणताही धोका पत्करण्याचे टाळल्याने होल्डरला काहीच लाभ झाला नाही. यष्टिरक्षक डॉवरिचने यंगचा एक अवघड झेल सोडला. पण यंग पुढच्याच चेंडूवर पायचीत झाल्याने ते जीवदान महागडे ठरले नाही.
43 धावसंख्येवर असणाऱया लॅथमचा झेल डॉवरिचने टिपला होता. पण त्यावर त्याने अपीलच केले नाही आणि गोलंदाज होल्डरही त्यावेळी शांतच राहिला होता. चहापानानंतर लॅथमने रोशला पुलचा चौकार मारून 19 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. तो 80 धावांवर असतानाही धावचीत होताना बचावला. रोशनेच त्याला अखेर त्रिफळाचीत करण्यात यश मिळविले. विल्यम्सननेही 49 धावांवर असताना अर्धशतकाची घाई केली नाही. 24 चेंडू खेळल्यानंतर रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत 33 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. या मैदानात 1000 पूर्ण करण्याचा मानही विल्यम्सनने मिळविला. याआधी रॉस टेलरने या मैदानावर हा टप्पा गाठला होता.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड प.डाव 78 षटकांत 2 बाद 243 धावा : लॅथम 86 (184 चेंडूत 12 चौकार, 1 षटकार), यंग 5 (11 चेंडूत 1 चौकार), विल्यम्सन खेळत आहे 97 (219 चेंडूत 16 चौकार), रॉस टेलर खेळत आहे 31 (61 चेंडूत 5 चौकार), अवांतर 24. गोलंदाजी : रोश 1-53, गॅब्रियल 1-62, होल्डर 0-25, जोसेफ 0-43, चेस 0-42).
केन विल्यम्सनच्या संवेदनशील वर्तनाची नेटिझन्सकडून वाहवा!

न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सनने याआधीही ‘जंटलमन’ वर्तनाने क्रिकेट वर्तुळावर आपला ठसा उमटवला आहेच. गुरुवारी कसोटीच्या पहिल्या दिवशी तोच ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’चा ध्वजधारक असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. विंडीजचा गोलंदाज केमार रोशचे वडील ऍन्ड्रय़ू स्मिथ यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली म्हणून दोन्ही संघ दंडाला काळय़ा फिती लावून मैदानात उतरले हेते. सामना सुरू होण्याआधी सर्व खेळाडू मैदानात आल्यावर विल्यम्सनने रोशसमोर जात त्याला आलिंगन देऊन त्याचे आधी सांत्वन करीत त्याला धीर दिला. क्रिकेट वेस्ट इंडीज व संघातर्फे रोशच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केल्याचे निवेदन संघाचे व्यवस्थापक रॉल लेविस यांनी जाहीर केले. कसोटीच्या तयारीत असतानाच रोशवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीणसमयी आमचा त्याला व त्याच्या कुटुंबियांना पूर्ण पाठिंबा आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे. क्रिकेट वेस्ट इंडीजनेही विल्यम्सन रोशला आलिंगन देत असल्याचा फोटो टाकला आहे. विल्यम्सनच्या या इमोशनल वर्तनाने मात्र नेटिझन्सकडून वाहवा मिळविली आहे.









