राज्यातील 5,762 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक
प्रतिनिधी/ बेंगळूर
ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. राज्यातील एकूण 5,762 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात 2,930 तर दुसऱया टप्प्यात 2,832 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.
राज्यातील 113 तालुक्यांतील ग्रामपंचायतींसाठी 22 डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर आहे. तर उर्वरित तालुक्यांतील ग्रामपंचायतींसाठी 27 डिसेंबरला दुसऱया टप्प्यातील निवडणूक होणार आहे. सोमवारी याबाबत त्या-त्या जिल्हय़ातील जिल्हाधिकारी अधिसूचना जारी करतील. त्यानंतर अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे.
उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणूक अधिकाऱयांकडे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आपला अर्ज दाखल करावयाचा आहे. तसेच संबंधित कागदपत्रांसमवेत अर्ज दाखल करणाऱयांचा अर्ज वैध ठरवला जाणार आहे. अन्यथा अर्जाच्या छाननीवेळी उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याची शक्यता आहे. तर दुसऱया टप्प्यातील निवडणुकीसाठी 11 डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर आहे. काही ग्रामपंचातींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे सदर ग्रामपंचायतींची निवडणूक होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. प्रचारासह सर्व ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
राज्यातील 5,762 ग्रामपंचायत व्याप्तीत एकूण 2,97,13,640 मतदार आहेत. यामध्ये 1,49,71,676 पुरुष तर 1,47,41,964 महिला मतदार आहेत. बिदर जिल्हय़ात मतदान यंत्राद्वारे निवडणूक होणार आहे. तर उर्वरित सर्व जिल्हय़ांमध्ये मतपत्रिकाद्वारे निवडणूक होणार असून कोरोना नियमांचे पालन करून सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान होणार आहे.









