71 मतदारसंघात उद्या मतदान : बिहार विधानसभा निवडणुकीत चुरस
पाटणा / वृत्तसंस्था
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रथम टप्प्यासाठीचा प्रचार समाप्त झाला आहे. या टप्प्यासाठी येत्या बुधवारी, अर्थात 28 ऑक्टोबरला मतदान होत आहे. कोरोना संसर्ग काळातील ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने तिचे अनन्यसाधारण महत्व आहे. पहिल्या टप्प्यात राज्याच्या 243 मतदारसंघांपैकी 71 मतदारसंघांमध्ये निवडणूक होईल. ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरूद्ध विरोधी आघाडी अशी जवळपास थेट लढत असली तरी लोकजनशक्ती पक्षानेही रंगत आणली आहे.
पहिल्या टप्प्याच्या प्रचारात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रचार केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही अनेक सभा घेतल्या. विरोधी आघाडीच्या वतीने राजद नेते तेजस्वी यादव यांनी किल्ला लढविला. राज्यात यानंतर 3 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबरला मतदानाचे आणखी दोन टप्पे होणार आहेत. 10 ऑक्टोबरला परिणाम घोषित होणार आहेत. मतदानाच्या टक्केवारीवरही राजकीय पक्षांचे लक्ष राहणार आहे.
लोजपमुळे वाढली चुरस
बिहार निवडणूक ऐन तोंडावर आलेली असताना लोकजनशक्ती पक्षाने (लोजप) रालोआशी काडीमोड घेऊन स्वतंत्ररित्या निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. या पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी प्रामुख्याने नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या विरोधात आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे चुरस वाढली आहे.
नक्षल प्रभावी क्षेत्रात मतदान
पहिल्या टप्प्यात गया, रोहटास आणि औरंगाबाद या तीन नक्षलप्रभावित जिल्हय़ांसह आणखी तीन जिल्हय़ांमध्ये मतदान होत आहे. एकंदर 1 हजार 66 उमेदवार मैदानात आहेत. त्यापैकी 114 महिला आहेत. नितीश कुमार मंत्रिमंडळातील कृष्णानंद वर्मा, प्रेम कुमार, जयकुमार सिंग, संतोषकुमार निराला, विजय सिन्हा आणि राम नारायण मंडल या सहा मंत्र्यांचाही कस लागणार आहे. या टप्प्यात राजदने 42, संजदने 41, भाजपने 29, काँगेसने 21 तर लोजपने 41 उमेदवारांना मैदानात उतरविले आहे.









