चिपळुणात पिलर उभारणीसाठीच्या खड्डय़ात साठले पाणी, बांधकाम रखडलेलेच,
चिपळूण
जुने बसस्थानक तोडून त्याठिकाणी नव्याने ‘हायटेक’ बसस्थानक उभारण्याची घोषणा होऊन तीन वर्षे होऊन गेली. मात्र तेव्हापासून केवळ पिलरसाठी खड्डे खोदण्यापलीकडे काहीही काम झालेले नाही. त्यातच नुकत्याच झालेल्या पहिल्याच पावसाचे पाणी पिलर उभारणीसाठी खणलेल्या खड्डय़ात साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. तसेच पिलरसाठी उभ्या केलेल्या लोखंडी सळय़ांना गंज पकडू लागला आहे. यामुळे ही इमारत कधी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
गेली अनेक वर्षे हे काम रेंगाळले असूनही एस.टी. महामंडळाकडू याविषयी पाठपुरावा होत नसल्याने प्रवाशांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. बसस्थानकाचे बांधकाम करणाऱया ठेकेदाराकडे असलेला कामगारवर्ग हा लॉकडाऊनमुळे आपल्या गावी गेला असून सध्यस्थितीत अवघा एक कामगार त्याच्याकडे उरला आहे. अशापरिस्थितीत बसस्थानकाचे प्रत्यक्ष बांधकाम होणे अवघड असून त्यातच पावसाचा हंगाम असल्याने यावेळीदेखील बसस्थानकाच्या कामाचा बट्टय़ाबोळ उडणार अशीच काहीशी चिन्हे निर्माण झाली आहेत.
याविषयी स्थानिक आगारासह विभागिय प्रशासनदेखील रस दाखवत नसून याचा त्रास मात्र विनाकारण प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यावरून नवीन हायटेक बसस्थानकाचे प्रवाशांचे स्वप्न लवकर पूण होईल असे वाटत नाही. त्यामुळे जुने बसस्थानक होते ते बरे होते, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे.









