शुक्रवारी 28 हजार लीटरची विक्री 55 दिवसानंतर तळीराम सुखावले
रत्नागिरी / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर करण्यात आलेलया टाळेबंदीमुळे सुमारे दोन महिने तळीराम दारूसाठी कासावीस झाले होती. मात्र, शुक्रवारपासून जिल्हय़ातील वाईन शॉप सुरू झाली. वाईन शॉपचे शटर उघडण्यापुर्वीच मद्यप्रेमींनी भल्या मोठय़ा रांगा लावल्या. पहिल्याच दिवशी तळीरामांनी तब्बल 28 हजार लीटरहून अधिक दारुची खरेदी केली असून त्यात 1 कोटीहून अधिकची उलाढाल झाली आहे. .
टाळेबंदीच्या पहिल्या दोन टप्प्यामध्ये मदिरा विक्रीला बंदी घालण्यात आली होती. यामुळे तळीरामांमध्ये अस्वस्थता पसरली होती. राज्य सरकारला मिळणाऱया महसुलापैकी मदिरेवरील कर हा महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे राज्य सरकारे देखील दारू दुकाने सुरु करण्यासाठी आग्रही होती. केंद्र व राज्य सरकारने दारू दुकाने सुरु करण्याविषयी टाळेबंदीच्या तिसऱया टप्प्यात अनुमती दिली. त्यानुसार राज्यात अनेक जिल्हय़ांमध्ये दारू दुकाने सुरूही झाली. मात्र रत्नागिरी जिल्हा त्याला अपवाद ठरला होता.
रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱयांनी तळीरामांची गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरूक घरपोच दारू विक्रीचा निर्णय जाहीर केला, मात्र अवघ्या 4 तासात तो मागे घेण्यात आला. त्यानंतर दुकाने उघण्याच्या अनुमतीबाबत आठवडाभर संभ्रमावस्थाच पाहायला मिळाली. अखेर शुक्रवारी 15 मे रोजी जिल्हयातील मद्य दुकानांचे शटर उघडले गेले.
रत्नागिरी जिह्यात गेल्या आठवडय़ात जवळपास सर्व दुकाने सुरु झाली. त्यामध्ये देशीची 46, वाईनची 9 आणि बिअरची 92 दुकाने उघडली होती. दुकाने उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी मद्यप्रेमींची झुंबड पाहायला मिळाला. अनेकांनी बाटलीचा हिशोब बाजूला ठेवत बॉक्सच्या हिशोबाने खरेदी केली. त्यामुळे दिवसभरात 27 हजार लीटर दारू विक्री झाली. यामध्ये देशी दारु 6 हजार लीटर, तर विदेशी मद्य 2100 लीटरचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बीअर विक्रीने नेहमीप्रमाणे उच्चांक नोंदवला असून 20 हजार लीटरची विक्री झाली. या सर्व मद्याची अंदाजे किंमत 1 कोटी रूपयांहूनही अधिक आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागात चौकशी केली असता सर्व ठिकाणी ग्राहकांचे थर्मल चेकिंग होते. सामाजिक अंतर ठेवून बाटलीची विक्री होते. सर्वांनी हाताला सॅनिटायझर आणि मुखपट्टी लावली असेल तरच माल विकला जातो. गर्दी होणार नाही अशी काळजी दुकान व्यावसायिक घेत आहेत. कोठेही मदिरा विक्रीवरून तक्रारी नाहीत. सर्व काही सुरळीत चालले आहे, असे सांगण्यात आले.









