बेळगाव महापालिकेसमोरील लाल- पिवळ ध्वज हटवण्याची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
बेळगांव महापालिकेसमोरील कन्नड वेदीकेनेने लावलेला लाल-पिवळा ध्वज हटवा, अन्यथा शनिवार 20 मार्च रोजी पश्चिम महाराष्ट्रीतील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात कन्नड व्यावसायिकांचे सर्व व्यवहार बंद केले जातील. असा इशारा कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे, संजय पोवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. कानडी व्यवसायिकांनी या आंदोलनात व्यवसाय बंद ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहनही देवणे यांनी केले आहे. अन्यथा गाठ आमच्याशी आहे. असा सज्जड इशारा संजय पवार यांनी दिला. यावेळी बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर, संपर्क प्रमुख अरविंद नागनुरे, प्रविण तेजब, सचिन गोरोळे मनजित माने आदी उपस्थित होते.
विजय देवणे म्हणाले, सीमाभागातील बेळगाव महापालिकेसमोर कन्नड रक्षक वेदिका या संघटनेने लाल-पिवळा ध्वज बेकायदेशीरपणे उभा केला आहे. यास महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेने आक्षेप घेऊन हा ध्वज हटवणेची मागणी केली आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेना यांच्या मोर्चास बेळगाव प्रशासनाने परवानगी नाकारली. शिवसेनेचा 21 जानेवारी रोजी शिनोळी येथे मोर्चा अडवला. शिवसेनेने कोतेवाडी जि. बेळगाव येथे भगवा ध्वज फडकवला. जिल्हा पोलीस प्रमुख आमटे यांनी भाषिक तेढ निर्माण करणे, असा काकती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणेत आला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 8 मार्च रोजी निघणार्या मोर्चात कोल्हापूर जिल्हा शिवसेना सहभागी होऊ नये, यासाठी मला बेळगाव जिल्हाबंदी केली. त्यानंतर बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर कन्नड रक्षक वेदिकेच्या गाव गुंडानी हल्ला केला. हा सर्व घटनाक्रम पाहता कोल्हापूर जिल्हा शिवसेनेने दि. 12 मार्चपासून कर्नाटक एस.टी. व भाडोत्री वाहनांना महाराष्ट्र बंद केले आहे. अजुनही मराठी भाषिकांवर अन्यायी वागणूक करत आहे. यास बेळगाव जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन पाठीशी घालत आहे. असा आरोप देवणे यांनी केला.
प्रकाश शिरोळकर यांचेवर हल्ला करणार्या हल्लेखोरांना अटक झाली नाही. लाल-पिवळा ध्वज काढलेला नाही. शिवसेनेचा याविरोधी संघर्ष सुरु आहे. बेळगाव महानगरपालिके समोरील लाल पिवळा ध्वज त्वरित हटवा, अन्यथा कोल्हापूर, सांगली, सातार्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कानडी उद्योजकांचे सर्व व्यवहार बंद केले जातील, याची कर्नाटक सरकारने नोंद घ्यावी, असे संजय पवार म्हणाले.
मराठी द्वेष कमी झालेला नाही : प्रकाश शिरोळकर कानडी लोकांच्या पाठिशी तेथील प्रशासन आहे, त्यामुळे त्यांचा द्वेष अजूनही कमी झालेला नाही, या विरोधात आमचा लढा सुरु आहे. पोलीस बळाचा वापर करुन आम्हाला नाहक त्रास दिला जात आहे. असा आरोप बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केला आहे, सीमाभाग म्हणजे महाराष्ट्राची आई आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करुन लवकरात लवकर आम्हाला अन्यायाच्या जोखडातून मुक्त करावे, अशी मागणी शिरोळकर यांनी केली.









