भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांची हवा टाईट केली आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. भाजप बंगालमध्ये जिंकला तर धार्मिक
ध्रुवीकरणाचे त्याचे कार्ड फत्ते झाले आणि ‘जय श्रीराम’ ने बाजी मारली असा होईल.
बंगालमधील निवडणुकीची पहिली फेरी झाली आहे. त्यात झालेले अभूतपूर्व मतदान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे ‘असोल परिवर्तन’ (खरा बदल) काय याचे उत्तर दोन मे ला मिळणार आहे. पण भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांची हवा टाईट केली आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. भाजप बंगालमध्ये जिंकला तर धार्मिक ध्रुवीकरणाचे त्याचे कार्ड फत्ते झाले आणि ‘जय श्रीराम’ ने बाजी मारली असा होईल. बंगालमध्ये 30 टक्क्यापेक्षा जास्त मुस्लिम समाज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आरोप केल्याप्रमाणे वाळवी पसरल्याप्रमाणे बांगलादेशातील घुसखोरांनी बंगालमध्ये शिरकाव केला आहे. खरे खोटे काळच ठरवेल पण सामान्य नागरिकात या कथित घुसखोरीने काळजी निर्माण केली आहे हे मात्र खरे. ममतादीदी या मुस्लिमधार्जिण्या आहेत अशी धारणा निर्माण करण्यात मोदी-शहा काही अंशी यशस्वी झाले आहेत हे मात्र खरे.
पण पहिल्या फेरीवरून निवडणुकीच्या निकालाबाबत निष्कर्ष काढणे हे धाडसाचे ठरेल कारण बंगालमध्ये मतदानाच्या आठ फेऱया आहेत. ममतादीदी या स्ट्रीट फायटर म्हणून प्रसिद्ध आहेत. दहा वर्षांपूर्वी त्यांनी 33 वर्षे सत्तेत असलेल्या मार्क्सवाद्यांना हुसकावून लावले ते त्यांच्या आरपार लढाईच्या बळावरच. त्या हार मानणाऱया नाहीत आणि ‘मेरा बंगाल नही दूंगी’ असे झांशीच्या राणीच्या अविर्भावात गर्जत आहेत. लक्ष्मीबाई इंग्रजांशी लढली, तर ममतादीदी आपण ‘बाहेरच्यांशी’ लढत आहोत असे सांगत स्वतःला बंगाली अस्मितेचे प्रतीक भासवत आहेत. गेल्या दहा वर्षात तृणमूल सत्तेत असल्यापासून बंगालमध्ये बरीच विकासाची कामे झाली आहेत आणि ममतादीदी तळागाळापर्यंत केवळ पोचलेल्याच नाहीत तर त्यांनी एक मतपेढी बांधली आहे. याचा अर्थ तृणमूलच्या शासनकाळात भ्रष्टाचार झाला नाही असा मात्र अजिबात नाही. ज्या राज्यात नाममात्र उद्योगधंदे शिल्लक आहेत आणि बऱयाच उद्योगांचे पलायन गेल्या 30-40 वर्षात झालेले आहे, तिथे पक्ष कार्यकर्ता हा विकासाच्या प्रकल्पांमध्ये कट मारून समृद्ध झाला. शारदा चिट फंड आणि तत्सम घोटाळे म्हणजे मिळेल तिथे हात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मारला आहे. आता केंद्रीय तपास संस्थांनी जेव्हा फास आवळायला सुरुवात केली तेव्हा असे बरेच वादग्रस्त नेते भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. एकेकाळी तृणमूलमध्ये ममतांच्या खालोखाल ज्यांचा दरारा होता ते मुकुल रॉय हे भाजपमधील बडे प्रस्थ झालेले आहेत. नंदीग्राममध्ये ममतांच्या विरोधात मैदानात उतरलेले सुवेंदू अधिकारी हे कालपरवापर्यंत ममतांचे उजवे हात म्हणून ओळखले जायचे.गमतीची गोष्ट अशी आहे की भाजप म्हणजे एक प्रकारे तृणमूलमधून आयात केलेल्या पुढारी आणि कार्यकर्त्यांमुळेच शक्तिशाली झाली आहे, त्यात मूळ भाजपचे लोक फारसे नाहीत. जर लोकांना मूळ तृणमूल आणि डुप्लिकेट तृणमूलमध्ये निवड करायची झाली तर ते मूळ तृणमूलबरोबर राहून ‘डुप्लिकेट’ ला वाटेला लावतील असे भाजपला शालजोडीतील मारले जात आहे ते सर्वस्वी चुकीचे आहे असे नाही. याचबरोबर हेही खरे की सर्व पक्षातील सोम्या-गोम्याना सामावून घेऊनच तृणमूलने आपले दुकान म्हणजे एक राजकीय डिपार्टमेंटल स्टोअर बनवले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचे एक रणनीतीकार असलेले प्रशांत किशोर हे बंगालच्या निवडणुकीत ममतादीदीचे सल्लागार आहेत. तृणमूलला चांगल्या पद्धतीचे बहुमत या निवडणुकीत मिळाले नाही तर आपण निवडणूक रणनीतीकार म्हणून काम कायमचे सोडून देऊ अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी केली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात बंगालमध्ये डावे राजकारण प्रबळ राहिले मग काँग्रेस सत्तेवर असो वा मार्क्सवादी. जमीनदारीचा प्रभाव असलेल्या बंगालसारख्या राज्यात हे अपेक्षित होते. या निवडणुकीत प्रथमतःच भाजपच्या रूपाने एक उजवी शक्ती राज्यात उदय पावत आहे, तसा प्रयत्न करत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत 42 पैकी 18 जागा जिंकून भाजपने बंगाल बदलाच्या उंबरठय़ावर आहे असेच दाखवले होते.
बंगाल पण एक राजकीयदृष्टय़ा अनाकलनीय राज्य आहे असे काहीजण मानतात. 1987 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोलकत्ता म्हणजे एक ‘मरणासन्न शहर’ असे संबोधून एक वाद माजवला होता. तेव्हा राजीवच्या निवडणूक सभांना एवढी गर्दी होत होती की आपल्या हाती सत्ता येणार अशा भ्रमात असलेल्या राज्यातील प्रियरंजन दासमुन्सी, सुब्रतो मुखर्जा यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी तर मंत्रिमंडळ वाटप करून आपल्याकडे चांगली खाती देखील घेतली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसला 40 च्या सुमारास जागा मिळाल्या होत्या.
सुनील गाताडे








