गुवाहाटी, कोलकाता / वृत्तसंस्था
आसाम आणि पश्चिम बंगाल येथील विधानसभा निवडणुकांच्या मतदानाचा दुसऱया टप्पा काही हिंसक घटना वगळता पार पडला आहे. या टप्प्यात गुरूवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 80.53 टक्के तर आसाममध्ये 73.03 टक्के मतदान झाले. ही टक्केवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची आहे असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. मतदानाची वेळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होती. 6 नंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अंतिम टक्केवारी यापेक्षा जास्त राहणार असून ती शुक्रवारी सकाळपर्यंत घोषित होऊ शकेल असेही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.
27 मार्चला पार पडलेल्या याच दोन राज्यांमधील पहिल्या मतदान टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 84.38 टक्के तर आसाममध्ये 77.34 टक्के मतदान झाले होते. आतापर्यंत दोन्ही राज्यांमध्ये मतदान बव्हंशी शांततेने पार पडले आहे. मतदानाचा तिसरा टप्पा 6 एप्रिलला आहे. या टप्प्यात या दोन राज्यांमधील काही मतदारसंघांप्रमाणेच तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी येथील सर्व मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. तिसऱया टप्प्यात आसामचे मतदान संपणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये त्यापुढे आणखी पाच टप्पे आहेत. सर्वत्र मतगणना 2 मे ला आहे.
69 मतदारसंघ
गुरूवारी पार पडलेल्या तिसऱया टप्प्यात आसाममधील 39 तर पश्चिम बंगालमधील 30 अशा 69 मतदार संघांमध्ये मतदान झाले. आसाममध्ये एकंदर 10,819 मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट यंत्रे उपयोगात आणण्यात आली. तर पश्चिम बंगालमध्ये 10,620 मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट यंत्रे उपयोगात आणण्यात आली. यंत्रे बंद पडण्याचे प्रमाण अत्यल्प होते.
पश्चिम बंगालमध्ये 2 ठार
हिंसाचाराच्या काही घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. तर तृणमूलच्याही एका कार्यकर्त्याचा भोसकल्यामुळे मृत्यू झाला. या संपूर्ण निवडणुकीत सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या नंदीग्राममध्ये प्रचंड उत्साहात मतदान झाले. सकाळी 10.30 च्या आसपास भाजप उमेदवारी सुवेंदू अधिकारी यांच्या कारवर दगडफेक झाली. मात्र, ते पूर्णतः सुखरूप राहिले. भाजप व तृणमूल यांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या आहेत. आसाममध्ये शांततेत मतदान झाले.
ममता बॅनर्जींचा आरोप
ममता बॅनर्जी यांनी मतदान संपेपर्यंत नंदीग्राममध्येच ठाण मांडले होते. गेले पाच दिवस त्या येथेच आहेत. तृणमूलची कोणतीही तक्रार निवडणूक आयोग ऐकून घेत नाही. कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा विचार आपण करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी दिवसभर व्हीलचेअरवरून अनेक मतदानकेंद्रांचा दौरा केला.
मोदी विरूद्ध दीदी शब्दयुद्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी पश्चिम बंगालमध्ये प्रचंड जाहीर सभा घेतल्या. नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांचा पराभव निश्चित आहे. दीदी आता तुम्ही अन्य कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहात, असा खोचक प्रश्नही त्यांनी सभांमध्ये विचारला. हे राज्य आता खऱयाखुऱया परिवर्तनाच्या दिशेने चालले असून 2 मे या दिवशी हे स्पष्ट होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. राज्याच्या एका भागात मतदान सुरू असताना पंतप्रधान मोदींना सभा कशी करू दिली जाते असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी विचारला. मात्र पंतप्रधान मोदींची ही सभा तिसऱया टप्प्यातील मतदारसंघामध्ये होती. त्यामुळे कोणताही कायदेशीर आक्षेप घेता येणार नाही, असे मत तज्ञांनी व्यक्त केले. बॅनर्जी दुसऱया कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाहीत, असे तृणमूल काँगेसच्या वतीने नंतर पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आले. राज्यात मतदानाचा तिसरा टप्पा 6 एप्रिलला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग सर्व सज्जता करीत आहे.









