ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये सतत वाढत असलेली कोरोनाची रुग्ण संख्या लक्षात घेऊन ममता सरकारने राज्यात 16 ते 30 मे दरम्यान कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे बंगालमध्ये आता या 15 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये केवळ आवश्यक सेवा सोडून मेट्रो आणि बस सेवा सह सर्व सेवा बंद असणार आहेत. याशिवाय सर्व, शाळा – महाविद्यालये आणि शिक्षण संस्थाही पूर्णत: बंद राहणार आहेत.

ममता सरकारचे मुख्य सचिव अलपन बंदोपाध्याय यांनी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत. या लॉकडाऊनची सुरुवात 16 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून होणार असून 30 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार आहे. या काळात केवळ आपत्कालीन सेवांना परवानगी देण्यात येईल.
आंतरराज्यीय बस सेवा, मेट्रो, फेरी सर्व्हिस, जिम, सिनेमा हॉल, सलून, जलतरण तलाव बंद राहतील. किरकोळ सामानाची दुकाने सकाळी 7 ते सकाळी 10 या वेळेत खुली असतील. यावेळी लोक अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करू शकतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या सोबतच, शिक्षण, सांस्कृतिक, प्रशासकीय, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी राहील. 50 पेक्षा जास्त लोक लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. खासगी वाहने, टॅक्सी, वाहन सेवेची वाहतूकही 30 मेपर्यंत बंद असणार आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा लहान भाऊ असीम बॅनर्जी यांचे शनिवारी सकाळी कोरोनामुळे निधन झाले आहे. मागील महिन्याभरापासून ते कोरोना संक्रमणाशी झगडत होते.









