भाजप कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले, दुकानांची लूट, केंद्राने मागविला अहवाल
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतगणनेनंतर प्रचंड हिंसाचार उफाळला आहे. विविध ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून त्यात भाजपच्या सहा कार्यकर्त्यांचा समावेश आहे. भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले करण्यात आले असून साधारणतः 200 दुकाने लुटण्यात आली आहेत. बीरभूम जिल्हय़ाच्या काही भागांमध्ये हिंदूंच्या घरांवर हल्ले झाले असून अनेकांनी सुरक्षेसाठी स्थलांतर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. काँगेस व डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवरही हल्ले झाले झाल्याचा आरोप त्या पक्षांनी केला असून तृणमूल काँगेसनेही आपले दोन कार्यकर्ते मारले गेल्याचा दावा केला.
रविवारी मतगणना झाल्यानंतर तृणमूल काँगेसचा प्रचंड विजय झाल्याचे स्पष्ट झाले. तथापि, तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करतानाच भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचा सपाटा लावला, असा आरोप होत आहे. आरामबाग मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांच्या घरांची हानी करण्यात आली. तर सितालकुचली मतदारसंघात एका भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. दंगली होत असताना पोलीसांनी बघ्याची भूमिका घेतली असा आरोप भाजपने केला. तसेच हे हल्ले सूडबुद्धीने केले जात आहेत, असाही आरोप पक्षाने केला.
बीरभूम जिल्हय़ात हिंदूंना लक्ष्य
राज्याच्या बीरभूम जिल्हय़ाच्या काही भागांमध्ये हिंदूंच्या घरांवर हल्ले करण्यात येत आहेत. महिलांची अब्रू लुटण्याचे प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. काही भागांमधून हिंदू लोकांनी भीपीपोटी पलायन केले आहे. भाजपचे माजी खासदार स्वपन दासगुप्ता यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविले असून केंद्रीय पोलीस दले त्वरित पाठविण्याची मागणी केली आहे.
4000 घरांवर हल्ले
भाजपचे कार्यकर्ते आणि या पक्षाच्या समर्थकांना वेचून लक्ष्य बनविण्यात येत आहे. या पक्षाच्या 4000 हजार कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले करून त्यांची हानी करण्यात आली आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप अनेक भाजप कार्यकर्ते करीत आहेत. भाजपचे कार्य केल्याचा सूड उगविण्यासाठी तृणमूलचे कार्यकर्ते गटागटाने हिंसाचार करीत आहेत, असेही या पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजप र्कायकर्त्यांची असंख्य दुकाने राज्याच्या विविध भागांमध्ये लुटण्यात आली आहेत.
फाळणीच्या वेळची परिस्थिती
पश्चिम बंगालमध्ये आज ज्या दंगली होत आहेत, तशा भारताच्या फाळणीच्यावेळी झाल्या होत्या, असे एकिवात आहे, असा गंभीर आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केला आहे. हिंसाचाराचे वृत्त थडकताच ते कोलकाता येथे मंगळवारी पोहचले. हिंसाचारात ठार झालेल्या भाजपच्या दोन कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतील. हिंसाचार आटोक्यात आला नाही, तर केंद्र सरकारला कठोर कारवाई केल्याशिवाय गत्यंतर नाही. तृणमूलला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा भाजपच्या अनेक नेत्यांनी दिला आहे.
पंतप्रधान मोदींकडून गंभीर दखल
राज्यात भडकलेल्या हिंसाचाराची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून त्यांनी राज्यपाल जगदीप ढंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. केंद्र सरकारने राज्य सरकारकडून अहवाल मागविला असून त्या आधारावर पुढील कारवाई केली जाणार आहे. राज्य प्रशासनाने त्वरित हिंसाचार रोखावा आणि शांतता प्रस्थापित करावी, असा आदेश केंद्रीय गृहविभागाने दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका
पश्चिम ब् ांगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य बनविण्यात येत असून सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा, अशीही मागणी याचिकेत आहे.









