प्रचारात पिछाडीवर राष्ट्रीय पक्ष
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांमधील मतदान पार पडले आहे, पण काँग्रेसचा आतापर्यंत या दोन्ही टप्प्यांमधील मतदारसंघात कुठेच प्रचार दिसून आलेला नाही. काही छोटय़ा सभा आणि पत्रकार परिषदा वगळल्यास आतापर्यंत काँग्रेसचे नेते कमीच दिसून आले आहेत. पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी स्वतःचा लोकसभा मतदारसंघ मुर्शिदाबाद आणि हावडाच्या काही भागांवरच लक्ष देत आहेत.
राज्यात आयएसएफ आणि डाव्यांसह आघाडी करणाऱयाने काँग्रेसने 92 उमेदवार उभे केले आहेत. पहिल्या टप्प्यात काँग्रेसच्या वाटय़ाला 13 मतदारसंघ आले होते. पण यातील कुठल्याच मतदारसंघात दिग्गज नेत्यांनी प्रचारास जाणेही टाळले आहे. केवळ राज्याचे प्रभारी जितिन प्रसाद हेच जबाबदारी सांभाळताना दिसून आले आहेत.
प्रत्येक टप्प्यासाठी मोठय़ा स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली आहे. पक्षाचा अंतिम 3 टप्प्यांमधील प्रचारावर भर असणार आहे. अखेरच्या 3 टप्प्यांमधील मतदारसंघांत पक्षाचे अस्तित्व आहे. आमचे बळ नसलेल्या ठिकाणी आम्ही आमची शक्ती वाया घालवू इच्छित नाही. अखेरच्या टप्प्यांमध्ये आम्ही स्टार प्रचारकांना उतरवू असे उद्गार एका काँग्रेस नेत्याने काढले आहेत.
काँग्रेसच्या प्रचारमोहिमेची तुलना भाजपसोबत केल्याची स्थिती पूर्णपणे उलट आहे. काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करणाऱया जी-23 गटातील एका नेत्याने यासंबंधी भूमिका मांडली आहे. काही वर्षांपूर्वी भाजपचे पश्चिम बंगालमध्ये फारसे बळ नव्हते. पण भाजप त्याच स्थितीत राहिलेला नाही. भाजप आज राज्यात मुख्य विरोधी पक्ष ठरला आहे. भाजप कधीच सेफ गेम खेळत नाही, ते जोखीम पत्करतात आणि अखेरीस मुख्य आव्हानकर्ते म्हणून समोर येतात. प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेत असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यास यशस्वी ठरतात. काँग्रेस पक्ष स्वतःच्या सद्यकालीन भूमिकेसह यश मिळवू शकणार नसल्याचे या नेत्याने म्हटले आहे.









