निवडणूक तयारीला वेग : पक्षाच्या नेत्यांशी चर्चा
वृत्तसंस्था/ कोलकाता
बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाने उत्साही होत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीत भाग घेण्याची घोषणा केली होती. यानुसार ओवैसी यांनी रविवारी पश्चिम बंगालचा दौरा करून राजकारण तापविले आहे. राज्यातील हुगळी शहरात ओवैसी यांनी पक्षाच्या नेत्यांशी आगामी निवडणुकीच्या तयारीसंबंधी चर्चा केली आहे. हुगळीतील फुरफुरा शरीफ दर्ग्यालाही त्यांनी भेट दिली आहे.
गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांमध्येही एआयएमआयएम करता शक्यता ते शोधत आहेत. गुजरातमध्ये ओवैसी यांच्या पक्षाने भारतीय ट्रायबल पक्षासोबत आघाडी केली आहे.
मध्यप्रदेशात होणाऱया पालिका निवडणुकीत एआयएमआयएमचे उमेदवार दिसून येण्याची शक्यता आहे. परंतु सद्यकाळात ओवैसी यांची नजर पश्चिम बंगालवर केंद्रीत झाली आहे. या राज्यात मुस्लिम लोकसंख्या अन्य राज्यांच्या तुलनेत खूपच अधिक आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याच्या लोकसंख्येत मुस्लिमांची हिस्सेदारी 27 टक्के आहे. याचमुळे विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएम स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत ओवैसी यांच्या पक्षाने 60 टक्क्यांहून अधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या 5 जागांवर विजय मिळविला होता. एआयएमआयएमच्या कामगिरीमुळे मुस्लिमांना स्वतःची मतपेढी मानणारे अन्य पक्ष धास्तावले आहेत. ओवैसी यांच्या बंगालमधील एंट्रीमुळे भाजप आनंदी आहे, तर ममता बॅनर्जी यांच्या चिंता वाढल्या आहेत. मुस्लिमांची मते विखुरल्यास तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो.