ऑनलाईन टीम / कोलकाता :
कोरोना नंतर आलेल्या ‘अम्फान’ चक्री वादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. या चक्री वादळाने रौद्र रूप धारण केले असून आता पर्यंत पश्चिम बंगालमधील 72 जणांचा बळी घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अम्फान चक्री वादळामूळे बंगाल मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चक्री वादळात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना 2 लाख 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
या बद्दल बोलताना ममता बॅनर्जी म्हणल्या की, अम्फान चक्री वादळाने आता पर्यंत पश्चिम बंगालमधील 72 लोकांचा जीव घेतला आहे. आता पर्यंत इतके भयानक चक्री वादळ मी कधीच पाहिले नव्हते.
पुढे त्या म्हणाल्या, मी पंतप्रधानांना राज्याचा दौरा करण्याची आणि येथील परिस्थितीचा आढावा घेण्याची विनंती करते. तसेच हे वादळ कोरोना विषाणू पेक्षा भयंकर आहे, असं ही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन्ही राज्यात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.









