पोल्ट्री व्यावसायिकांनी भीती न बाळगण्याचे आवाहन ः अधिकाऱयांना गावोगावी फिरून सर्व्हे करण्याच्या सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
अलीकडच्या काही वर्षांत जिल्हय़ात पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी देशातील काही राज्यांमध्ये बर्ड-फ्लूचे संक्रमण वाढले होते. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत होते. मात्र, राज्यात अद्यापही बर्ड-फ्लूचे प्रकरण समोर आले नाही. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता व्यवसाय करावा, असे आवाहन पशुसंगोपन खात्याने केले आहे. नुकताच पशुसंगोपन खात्यामार्फत जिल्हय़ातील पोल्ट्री फार्मना भेटी देऊन खबरदारीच्या उपायांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकाऱयांना गावोगावी फिरून सर्व्हे करण्याच्या सूचना केल्या आहेत. बर्ड-फ्लूसंबंधीची लक्षणे दिसून आल्यास तातडीने त्याचे नमुने घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत. शिवाय खबरदारी म्हणून परराज्यांतून होणाऱया पक्ष्यांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. चिकन, अंडी खवय्यांनी मनात कोणती भीती न बाळगता त्याचे सेवन करावे, असेही खात्यामार्फत सांगण्यात येत आहे.
बर्ड-फ्लूच्या पार्श्वभूमिवर पशुसंगोपन खात्याच्या अधिकाऱयांनी जिल्हय़ातील पोल्ट्री फार्मना भेटी दिल्या. दरम्यान पोल्ट्रीत स्वच्छता, पक्ष्यांची काळजी याविषयी पोल्ट्री व्यावसायिकांना सूचना केल्या. जिल्हय़ात दरवषी पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या वाढत आहे. मात्र, गेल्या पाच-दहा वर्षात व्यावसायिकांसमोर अनेक संकटे उभी आहेत. कोरोनाकाळाच्या दरम्यान बाजारपेठा बंद राहिल्याने पक्ष्यांची उचल झाली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना लाखोंचा फटका बसला. त्यातून सावरण्यापूर्वीच शेजारील राज्यात बर्ड-फ्लूची काही प्रकरणे पुढे आल्याने स्थानिक व्यावसायिकही चिंतेत होते. मात्र, स्थानिक पातळीवर बर्ड-फ्लूचे एकही प्रकरण समोर आले नसल्याने पोल्ट्री व्यावसायिकांनी घाबरू नये, अशा सूचना खात्याने केल्या आहेत.
जिल्हय़ातील तालुकानिहाय पोल्ट्री फार्मची संख्या
तालुके | एकूण पोल्ट्री फार्म |
अथणी | 88 |
बैलहेंगल | 69 |
बेळगाव | 176 |
चिकोडी | 81 |
गोकाक | 51 |
हुक्केरी | 35 |
खानापूर | 101 |
रायबाग | 208 |
रामदुर्ग | 40 |
सौंदत्ती | 12 |
एकूण | 861 |