प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव पशुवैद्यकीय खात्याच्या अंतर्गत येणाऱया पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या आवारात 2 हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पशुवैद्यकीय दवाखानेदेखील हिरवाईने फुलणार आहेत. पर्यावरण समतोल, संवर्धनासाठी पर्यावरण संवर्धन विभागाने हा उपक्रम राबविला आहे. जिल्हय़ातील विविध पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या आवारात विविध जातीच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
जिल्हय़ातील प्रत्येक पशुसंगोपन खात्याच्या आवारात ‘झाडे लावा झाडे जगवा’ या संकल्पनेच्या आधारावर हा उपक्रम राबविला जाणार आहे. पर्यावरणपूरक वातावरण तयार करण्यासाठी सतत खात्याची धडपड सुरू आहे. त्यादृष्टीने विविध ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या सभोवताली व आवारात रोप लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे.
जिल्हा प्रशासन, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग यांच्यामार्फत दरवषी रोप लागवड करून वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरवषी ठिकठिकाणी वनमहोत्सव साजरा करून या उपक्रमाला प्रोत्साहन दिले जाते. नुकतीच पशुसंगोपन मंत्री प्रभू चौहाण यांनी पशुसंगोपन खात्याच्या आवारात रोप लागवड करून या उपक्रमाला चालना दिली आहे. पाण्याची उपलब्धता, भौगोलिक स्थिती विचारात घेऊन दवाखान्यांच्या आवारात विविध फुला-फळांची रोप लागवड करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. पर्यावरणपूरक आणि फळ देणाऱया रोपांची खात्यामार्फत निवड केली जाणार असून त्यामध्ये फणस, लिंबू, पेरू, आंबा, कडीपत्ता, नारळ, जांभूळ, डाळिंब, पपई, सीताफळ, आवळा आदी रोपांचा समावेश राहणार आहे. त्यामुळे ही योजना पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाची
ठरणार आहे.
संपूर्ण जिल्हय़ात 30 हजार रोपांची लागवड करण्यात येणार असून त्यापैकी बेळगाव विभागात 1 हजार तर चिकोडी विभागात 1 हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. पशुसंगोपन कार्यालय, तालुका पशुसंगोपन कार्यालय, प्रशिक्षण केंद्रासह तालुक्मयातील हिरेबागेवाडी, सांबरा, उचगाव, अनगोळ, के. के. कोप्प, हुदली, कडोली, संतिबस्तवाड, येळळूर, बेळगुंदी, आंबेवाडी, काकती, सुळेभावी, महांतेशनगर, वडगाव, हलगा, निलजी, नंदिहळ्ळी, किणये आदी ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या आवारात ही रोप लागवड केली जाणार आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखानेही हिरवाईने नटणार आहेत.









