चौकशीची तळवणेकरांची मागणी
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी येथे असलेले काही पशुवैद्यकीय अधिकारी (उदा. मळगाव, माडखोल) एखाद्या शेतकऱयांच्या जनावराला कुठल्याही प्रकारचा आजार असला की फोन लावला तर येण्यास टाळाटाळ करतात. याबाबत चौकशीची मागणी माजी जि. प. सभापती मंगेश तळवणेकर यांनी केली आहे.
बरेच डॉक्टर ‘मी आता इकडे आहे. तिकडे आहे’, असे सांगत 30 ते 40 कि. मी. च्या अंतराची सबब सांगतात. मात्र, ते शहरातच असतात. त्यांच्या या मनमानीला बरेच शेतकरी कंटाळले आहेत. तसेच काही डॉक्टर फी घेत आहेत. त्यामुळे ते सरकारी डॉक्टर आहेत की खासगी डॉक्टर, हेच समजत नाही. काही डॉक्टर माणुसकी सोडून वागत आहेत. तसेच काही डॉक्टर चांगले काम करतात. मळगाव येथील एक उदाहरण आहे. जनावरांना एक रोग आला आहे. त्या लसी मोफत असताना शेतकऱयांकडून मोठय़ा प्रमाणात पैसे उकळले जातात. यासंदर्भात पुरावे आहेत. तसेच बरीचशी जनावरे या तालुक्यातील मुजोर डॉक्टरांमुळे दगावली आहेत. याची संपूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी तळवणेकर यांनी केली आहे.