शेतकऱयांना मोठा फटका, अर्थकारणावर परिणाम, ताळमेळ बसणे कठीण झाल्याने चिंतेत भर
प्रतिनिधी /बेळगाव
मागील पंधरा दिवसात पशुखाद्याच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. परिणामी शेतकऱयांचे अर्थकारण विस्कटले आहे. उत्पादन आणि एकूण खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. आधीच महागाई त्यातच पशुखाद्याचे दर वाढल्याने जनावरांचे संगोपन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे. विशेषतः भुसा, शेंगापेंड, कुळीथ, सरकीपेंड, तूरचुन्नी आदी खाद्यांच्या दरात वाढ झाली आहे.
अलीकडे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळय़ा-मेंढय़ांचा समावेश आहे. जनावरांना पौष्टिक आहार म्हणून भुसा, तूरचुन्नी, शेंगापेंड, सरकीपेंड दिली जाते. शेतीत काम करणाऱया बैलांना कुळीथ तर दुभत्या जनावरांना शेंगापेंड, मकाभरडा, भुसा आदी खाद्य दिले जाते. मात्र, या खाद्यांच्या दरात प्रति क्विंटलमागे 200 ते 400 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जनावरांना खाद्य कसे घालावे, या विवंचनेत शेतकरी आहेत.
दरवाढीमुळे पशुपालक दुहेरी संकटात
मागील काही दिवसांपासून लम्पी संसर्गजन्य रोगाने धुमाकूळ घातला आहे. हजारो जनावरांना लागण झाली आहे. तर शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यामध्ये दुभत्या गायींचादेखील समावेश आहे. एकीकडे लम्पीने नुकसानग्रस्त शेतकऱयांना फटका बसवला आहे तर दुसरीकडे पशुखाद्याचे दर वाढत चालल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. दुभत्या जनावरांना पौष्टिकता म्हणून आणि सकस आहारासाठी खाद्य देणे आवश्यक आहे. मात्र, दुधाचा दर आणि पशुखाद्यासाठी येणारा खर्च याचा ताळमेळ बसेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. भुसा, सरकीपेंड याबरोबरच कोंडा, कणी, मकाभरडा व इतर खाद्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे दूधउत्पादक शेतकऱयांचे आर्थिक गणित कोलमडले आहेत. डेअरीतून दूध खरेदी करताना दुधाची प्रतवारी करून खरेदी केली जाते. मात्र, पशुखाद्याचे दर वाढल्याने उत्पादन व एकूण खर्चाचा ताळमेळ बसणे कठीण झाले आहे.
| पशुखाद्याचे दर | वजन | किमती |
| भुसा | 50 किलो | 1000 ते 1350 रु. |
| कांडीपेंड | 50 किलो | 650 ते 1300 रु. |
| सरकीपेंड | 45 किलो | 1350 ते 1700 रु. |
| मका भरडा | 50 किलो | 1150 ते 1300 रु. |
| तूरचुन्नी | 50 किलो | 1150 रु. |
| हरभरा चुन्नी | 50 किलो | 1200 रु. |
| शेंगापेंड | 50 किलो | 2100 रु. |
| कुळीथ | एक क्विंटल | 7000 रु. |









