भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर घणाघात
प्रतिनिधी/ सातारा
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्तास्थापनेची स्वप्ने पाहू नयेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने बेईमानीतून सरकार स्थापन केले होते. उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादीने जादूटोणा केल्याने ते सरकार बनले होते. त्यांच्यावर कोणी जादूटोणा केला हे सर्व महाराष्ट्रवासियांना, देशवासियांना माहिती आहे. शरद पवारांच्या जो सानिध्यात जातो तो सहजासहजी सुटत नाही. उद्धव ठाकरे यांनी आता केवळ काँग्रेसचे संविधान जवळ घेणे उरले आहे. ते काँग्रेसवासी झाले आहेत, अशी चौफेर टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. दरम्यान, त्यांनी बारामतीत राष्ट्रवादीचे घडय़ाळ बंद पाडू आणि सातारा पालिकेची निवडणूक ही कमळाच्याच चिन्हावर लढवली जाईल. दोन्ही राजांच्यामध्ये समझोता घातला जाईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
सातारा दौऱयावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आले असताना साताऱयात एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, विक्रम पावसकर, अतुल भोसले, माजी आमदार मदन भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ते म्हणाले, केंद्रीय पातळीवरुन माझ्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. मी संपूर्ण महाराष्ट्र फिरत आहे. तीन महिने त्यास होत आहेत. या प्रवासात पक्षाच्या संघटनात्मक विषयावर चर्चा होणार आहे. तर कोअर कमिटीच्या बैठकीत शासकीय विषयावर बैठक होणार आहे. त्या व्यवस्थेत सरकारकडून नेमका काय बदल करता येईल यावर चर्चा होईल. वर्षभरात जवळपास 250 च्यावर सामाजिक भेटी देणार आहे. मोठय़ा प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत. गेल्या अडीच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी, उध्दव ठाकरे यांची शिवसेना या तीन पक्षातील कार्यकर्त्यांना पाठबळ दिले गेले नाही. त्यामुळे कार्यकर्ता नाराज होऊन तो भाजपामध्ये प्रवेश करतो आहे. जो लहान कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्यालाही बळ दिले पाहिजे. हे त्या तीन पक्षांकडून झाले नाही.
नवीन सरकार महाराष्ट्रात आल्यावर सर्वसामान्य केंद्रबिंदू माणून काम सुरु केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी चांगले काम केले आहे, असे त्यांनी सांगितले. शिंदे, फडणवीस ही जोडी 13 कोटी जनतेची कामे करायला निघाली आहे. मागच्या सरकारने ठोस कामे कलेली नाहीत. लोकांच्यापर्यंत अपेक्षित विकास पोहोचला नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गरीब कल्याणच्या योजना आहेत. राज्यात 97 हजार बूथ केंद्र आणि 20 हजार शक्ती केंद्र आहेत आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरीब कल्याणाच्या योजना राबवण्यात येत आहेत. मला अभिमान आहे की पंतप्रधान मोदी यांच्यामुळे 5 कोटी 63 लक्ष लाभार्थींना गरीब कल्याणाचा योजनेचा लाभ झाला. 2 कोटी लाभार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठवणार आहेत. तसा निर्धार केला आहे. पूर्वीचे महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार यांचे जुळत नव्हते आणि आता केंद्र आणि राज्य यांचे टय़ूनिंग जमते, असे सांगितले.
2024 ला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला उमेदवार मिळणार नाहीत
मागच्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये 1100 पैकी 608 भाजपाने जिंकल्या आहेत. जनतेतून सरपंच ही सर्वसामान्य जनतेची मागणी होती. परंतु महाविकास आघाडीने ती रद्द केली होती. पुन्हा शिंदे, फडणवीस सरकारने सुरु केले. ग्रामपंचायत निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपा शिवसेनेचीच सत्ता येईल. येणाऱया विधानसभेत शिंदे फडणीस सरकारचे 200 हून अधिक आमदार आणि लोकसभेला 45 हून अधिक खासदार निवडून येतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.
अफझलखानाच्या कबरेच्या अतिक्रमणावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे असताना अनेकदा अफझल खानाच्या कबरीलगतचे अतिक्रमण हटवण्याबाबतचा मुद्दा विधीमंडळात अनेकदा आला. मात्र, मताच्या लागुंनचालनासाठी त्यांनी अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभार आम्ही मानतो. ते अतिक्रमण हटवण्यासाठी ज्या संघटनांनी आंदोलने केली त्यांचेही आभार मानतो. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत. मी त्यांच्या पाठीशी आहे, असे त्यांनी सांगितले.
जयंत पाटलांनी सत्तेची स्वप्ने पाहणे सोडून द्यावे
उद्धव ठाकरे हे जसे राष्ट्रवादी, काँग्रेसच्या सानिध्यात गेले तसे सामनातल्या मागच्या तीन वर्षातील बातम्या पहा. मीडियातून कपोलकल्पित आरोप करत आहेत. ते मुख्यमंत्री असताना किरीट सोमय्यांनी न्यायालयातून ऑर्डर आणली, सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे हे प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत. 40 वर्ष ज्यांनी सत्तेतून पैसे आणि पैशातून सत्ता मिळवली आहे. त्यांचे सुद्धा धाबे दणाणले आहेत. तुमच्यात जर धमक असेल तर कोर्टात जा, नुसतेच बोलघेवडे आहेत. मीडियाचे स्पेस घेण्याचे काम करत आहेत. राऊत यांना आता आरोप करण्याशिवाय दुसरे कोणते काम उरले नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादीने जादूटोणा केला आहे. तो कोणी केला हे महाराष्ट्राला देशाला माहिती आहे. शरद पवारांच्या जाळय़ात जो सापडतो तो सहजासहजी सुटत नाही. उद्धव ठाकरे यांनीही आता काँग्रेसचे संविधान आत्मसात करणे उरले आहे. जयंत पाटील यांनी सत्तेची स्वप्ने पाहणे सोडून द्यावे. महाविकास आघाडीची सत्ता जनतेची बेईमानी करुन आणली होती, अशीही टीका बावनकुळे यांनी केली.
राष्ट्रवादीचे बारामतीचे घडय़ाळ बंद पाडू
एकटय़ा बारामती शहराचा विकास म्हणजे अख्या बारामती तालुक्याचा विकास असे चित्र नाही. आजुबाजुच्या गावांमध्ये काय स्थिती आहे हे आम्ही पाहिले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी एक दिवस मुक्काम केला होता. मीही एकदिवस मुक्कामी होतो, त्यामुळे बारामतीत राष्ट्रवादीचे घडय़ाळ बंद पाडू असे आमचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी दावा केला. अजितदादांच्या नॉट रिचेबलबाबत छेडले असता ते म्हणाले, अजितदादा नेमकं काय करतील हे ना तुम्हाला कळणार ना आम्हाला कळणार. ते अजितदादा आहेत, असे हास्य करत उतर दिले.
सातारा पालिका आणि लोकसभा भाजपाच जिंकणार
सातारा लोकसभा मतदार संघ 100 टक्के भाजपाच जिंकणार असा दावा करत बावनकुळे म्हणाले, सातारा पालिकेतही भाजपाचीच सत्ता येईल. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्यामध्ये समेट घडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस हे चर्चा करतील. आणि त्यांच्यातील तिढा सोडवतील. पक्षाचा निर्णय योग्यच घेतला जाईल, आणि कमळ या चिन्हावरच सातारा पालिका निवडणूक लढवली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच त्यांनी इतिहासाची कोणी छेडछाड करु नये, खरा इतिहास दाखवला जावा, असेही स्पष्ट केले.








