महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण नेते म्हणून शरद पवारसाहेबांची ओळख आहे. आज वयाच्या 80 व्या वर्षीही ते ज्या तडफेने, उत्साहाने आणि सक्रियतेने कार्यरत आहेत ती बाब तरुणांनाही लाजवणारी आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटांनंतर ऍड. उज्ज्वल निकम आणि साहेबांची पहिली भेट झाली. त्यानंतरच्या गेल्या 27-28 वर्षांतील पवारसाहेबांशी संबंधित काही अज्ञात पैलू..
मी आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याच्या वाढदिवसाला गौरवपर लेख लिहिलेला नाही किंवा माझे विचार प्रकट केलेले नाहीत. परंतु शरद पवारसाहेब याला अपवाद ठरतात. कारण त्यांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही. तसेच आजही ज्या पद्धतीने तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने, जोमाने आणि हिकमतीने कार्यरत आहेत त्याचा आदर्श समाजामध्ये, राज्यामध्ये असला पाहिजे. राजकारणात पत, विश्वास-अविश्वास हे शब्द रुळलेले आहेत. त्यांचा आधार घेत पवारसाहेब केव्हा बाजू उलटवू शकतील याचा नेम नाही, असे राजकीय व्यक्तीच जेव्हा म्हणतात तेव्हा मला मोठे नवल वाटते. कारण राजकारणामध्ये अशा प्रकारची मूल्ये कधीच बाळगली जात नाहीत. पण राजकारणात विचारांचा एक ठसा असावा लागतो. हा विचारांचा ठसा आणि ठेवा पवारसाहेबांनी आजपर्यंत जोपासला आहे.

पवारसाहेबांची माझी पहिली भेट झाली ती 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर. या साखळी स्फोटांनंतर येथील परिस्थिती हाताळण्यासाठी साहेबांकडे राज्याचे नेतृत्त्व सोपवण्यात आले होते. बॉम्बस्फोटाच्या खटल्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पवारसाहेब, मी, सहपोलिस आयुक्त एम एन सिंह आणि अन्य काही पोलिस अधिकारी उपस्थित होतो. त्यावेळी साहेबांनी माझ्याकडे पाहिले आणि थोडय़ा वेळाने पोलिस आयुक्त आणि सहपोलिस आयुक्त यांना चेंबरमध्ये बोलावले. त्यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. चर्चा संपल्यानंतर मी आणि एम एन सिंह पोलिस आयुक्त कार्यालयात जाण्यास निघालो. त्यावेळी मी सिंहांना विचारले की, पवारसाहेबांचा माझ्यावर अविश्वास दिसतोय! ते ऐकून सिंह चमकले आणि माझ्याकडे पहात म्हणाले, ‘का? असे का वाटते?’ मी म्हणालो, ‘मला तसे जाणवले’ ते म्हणाले, ‘अविश्वास नाही. पण तुम्ही तरुण आहात, गावाकडून आलेले आहात. त्यामुळे या अतिमहत्त्वाच्या खटल्याची जबाबदारी समर्थपणे तुम्ही पेलू शकाल का, असे साहेबांचे विचारणे होते. पण आम्ही ‘हो, ते निश्चितपणे पेलू शकतील’ असे सांगितले आहे.’ साहजिकच मी पुन्हा विचारले, ‘पण अशी शंका त्यांना का वाटली?’ यावर सिंह म्हणाले की, तुम्ही जळगावहून आलेले आहात. मुंबईत अनेक प्रथितयश वकील असताना जर दुर्दैवाने तुम्ही या खटल्याचे नेतृत्त्व योग्यप्रकारे करू शकला नाहीत तर साहेबांना प्रचंड टीका सहन करावी लागेल. उलटसुलट आरोपही त्यांच्यावर केले जाऊ शकतात. त्यामुळेच त्यांनी आमच्याकडे विचारणा केली. परंतु आम्ही साहेबांना सांगितले आहे की ते व्यावसायिकदृष्टय़ा अत्यंत निपुणतेने काम करणारे आहेत. आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे.’ हे ऐकून साहेबांनी होकार दिला आहे.’
या सर्वाबाबत सुरुवातीला मला वाईट वाटले. परंतु नंतर परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतर मलाही साहेबांची शंका उचित वाटली. कारण त्यावेळची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. राजकीय-सामाजिक वातावरण संवेदनशील बनलेले होते. तसेच त्याकाळात साहेबांनी कोणतीही कृती केली तरी विरोधक त्यातून वेगळा अर्थ काढत होते. अशावेळी समजा जर पुराव्याअभावी या खटल्यातील आरोपी सुटले असते तर पवारसाहेबांनी बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींना मदत व्हावी म्हणून जाणीवपूर्वक ग्रामीण भागातील, नवशिक्या वकिलाची नेमणूक केली, अशी टीका करायलाही विरोधकांनी मागेपुढे पाहिले नसते. असे असूनही साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला, हे त्यांच्यातील दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.
एकदा प्रमोद महाजन यांनी मला ‘93च्या खटल्यात तुमची नियुक्ती कशी झाली?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर मला हसू आले. त्यांना या प्रश्नातून ‘माझी नियुक्ती पवारसाहेबांच्या सांगण्यावरून झाली होती का’ असे विचारायचे होते. म्हणून मी प्रमोद महाजनांना म्हणालो की, हा प्रश्न तुम्ही पोलिस आयुक्तांना विचारा. यावर ते काही बोलले नाहीत. पण त्यांच्या या प्रश्नातून मला पवारसाहेबांच्या मनातील भीती सार्थ होती हे लक्षात आले. त्याचवेळी त्यांनी दाखवलेल्या विश्वासाचे कौतुकही वाटले. नेतृत्त्वपदावर असणाऱया व्यक्तींमध्ये जोखीम पत्करून विश्वास टाकण्याचे कसब असले पाहिजे, हा संदेश यातून मिळाला. पुढे संजय दत्तच्या प्रश्नावरून माझे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे तीव्र मतभेद झाले होते. संजय दत्तला जामिनावर सोडण्यास माझी हरकत नाही, असे मी न्यायालयात सांगू शकणार नाही असे मी स्पष्टपणे सांगितले होते. सुरुवातीला बाळासाहेबांना ते पटले नाही. त्यांनाही मी पवारसाहेबांचा माणूस आहे असेच वाटत होते. नंतर त्यांचा हा गैरसमज दूर झाला. पण, मला तेव्हाही नवल वाटले होते. राजकारणात विरोधी भूमिका असते; पण पवारसाहेबांनी शत्रुत्त्व कधी ठेवले नाही. बाळासाहेबांची आणि पवारसाहेबांची राजकारणापलीकडची मैत्री सर्वश्रुत आहे. आज उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यामध्ये पवारसाहेबांची दूरदृष्टी दिसून येते. कारण असे करण्याने शिवसेनेमध्ये कुरबुरी राहणार नाहीत, याचीही दक्षता पवारसाहेबांनी घेतली. तसेच ही दक्षता घेत असताना वडिलकीच्या नात्याने महाविकास आघाडीतील सर्वच नेते आपला शब्द मानतील हा आत्मविश्वासही त्यांना होता.
पवारसाहेबांशी संबंधित दुसरा एक प्रसंग मला सांगावासा वाटतो. मागे एकदा एका मोठय़ा खटल्यामध्ये कसलेही पुरावे नसतानाही पोलिसांनी आरोपपत्र दाखल करून टाकले होते. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर मी ही गोष्ट घातली. माझा निर्णय होता की पुरावे नसल्याने त्या आरोपीला सोडण्यात आले पाहिजे. पण त्या खटल्याचा बोलबाला राज्यभर झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मला अन्य दोन-तीन नेत्यांचे म्हणणे जाणून घेण्यास सांगितले. मग मी पवारसाहेबांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. यावर साहेबांनी ताडकन उत्तर दिले की, तुमचा निर्णय योग्य आहे; पण आम्ही याचा राजकीय फायदा घेऊ आणि ते सरकारला अडचणीचे ठरेल. मला याबाबत त्यांचे कौतुक वाटले. कारण एखादा चतुर किंवा कावेबाज राजकारणी असता तर त्याने मला तुम्ही तुमच्या निर्णयानुसार पुढे जा असे सांगितले असते आणि त्यानंतर आपली राजकीय पोळी भाजून घेतली असती. परंतु पवारसाहेबांनी मनातील गोष्ट स्पष्टपणाने सांगितली. असा स्पष्टपणा राजकारणात आवश्यक असतो, हे लक्षात घ्यावे लागेल.
न झालेली एक मुलाखत
काही वर्षांपूर्वी पवारसाहेबांची उलटतपासणी करणारी मुलाखत घ्यावी, यासाठी बारामतीचे काही जण मला भेटायला आले होते. राज ठाकरेंनी पवारसाहेबांची मुलाखत घेतली त्याआधीची ही गोष्ट. मी त्यावेळी सांगितले की, हे काम खूप आव्हानात्मक आहे. तसेच मी केवळ साहेबांना आवडतील असे गोडगोड प्रश्न विचारणार नाही. हा लुटूपुटुचा सामना होणार नाही. मी एक गोष्ट निश्चितपणाने सांगतो की, साहेबांचा अवमान होईल असे मी काहीही बोलणार वा विचारणार नाही. पण मिळमिळीत प्रश्नही विचारणार नाही. त्यामुळे तुम्ही साहेबांशी एकदा सविस्तरपणाने बोला.’ यावर साहेब नकार देतील, असे मला वाटले होते परंतु आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या साहेबांनी या ‘सामन्याला’ सहमती दर्शवली. त्यानुसार मी या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या उलटतपासणीसाठीची माहिती जमवू लागलो. यासाठी साहेबांचे जीवलग मित्र विठ्ठल मणियार यांना भेटलो. माझी आणि विठ्ठलशेठ यांची ती पहिली भेट. त्यांच्याशी झालेल्या चर्चांमधून पवार साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या कार्यपद्धतीचे, अभ्यासूपणाचे, सहकार्यभावनेचे असंख्य पैलू माझ्यासमोर आले. साहेबांचा लोकसंग्रह किती दांडगा आहे आणि त्यांचा मित्रपरिवार किती विस्तारलेला आहे हेही मला जाणून घेता आले. पुढे काही कारणास्तव ही मुलाखत होऊ शकली नाही. पण त्यानिमित्ताने साहेबांविषयीची जी माहिती मिळाली त्यावरून मी असे म्हणेन की, अशी व्यक्तिमत्त्वे गुलबकावलीच्या फुलासारखी दुर्मिळ असतात.
राजकीय खेळ्या कधी चुकत नाहीत
पवारसाहेबांचा राजकीय आलेख नेहमीच उंचावलेला राहिला असला तरी काही प्रसंगी त्यांनी बॅकफूटवर जाण्याची भूमिकाही घेतलेली दिसते. अर्थात यातून त्यांनी आपल्या मनाची समृद्धी वाढवली असे मी म्हणेन. पवारसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाही. आपल्या गालावर पडणाऱया खळ्या या एकाच वेळी दोन्ही गालावर पडतात. पण पवारसाहेबांबाबत असे दिसते की त्यांच्या एका गालाला खळी पडली तर दुसऱया गालालाही ती समजत नाही. कदाचित त्यामुळेच त्यांच्या राजकीय खेळ्या कधी चुकत नसाव्यात.
आणखी एक प्रसंग मला आठवतोय तो म्हणजे, आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री असताना एकदा मला अचानकपणाने भेटायला बोलावले. जेवता जेवता ते म्हणाले की पवारसाहेबांना तुमची खूप काळजी वाटते. मी म्हणालो, ‘माझी काळजी? कशासाठी?’ त्यावर आबा म्हणाले की, तुम्ही माध्यमांसमोर बेधडकपणाने विधाने करत असता त्यामुळे त्यांना काळजी वाटते.’ एक सरकारी वकील त्याचे कर्तव्य निभावत असताना त्याच्या जीवाची मनापासून काळजी करणे, हा साहेबांच्यातील गुण मला आश्चर्यचकित करून गेला. किंबहुना, त्यांच्या लोकप्रियतेमागचे गमक या सहृदयतेतच असावे असे मला वाटते.
मध्यंतरी, साहेबांना एकदा ब्रीच कँडीला दाखल केले होते. त्यावेळी मी भेटायला गेलो होतो. ते बेडवर झोपलेले होते. तशा स्थितीतही त्यांनी मला विचारले की, ‘तुम्हाला भीती वाटत नाही का हो?’ मी हसून म्हणालो की, नाही. मी आव्हान म्हणून प्रत्येक खटल्याकडे पाहतो. प्रत्येक खटल्यातील गुन्हेगाराला, त्याच्याविरुद्ध लढताना युक्तिवादाच्या वेळी, उलटतपासणीच्या वेळी, जबाब नोंदवून घेताना मी कठोर असतो. एरवी माझ्या मनात व्यक्तिगत शत्रुत्त्व नसते.’ माझे बोलणे ते अत्यंत शांतपणाने ऐकत होते आणि त्यावर त्यांनी एक स्मित दिले.
गुणग्राहकता हा त्यांचा एक खूप मोठा गुण
गतवर्षी लोकसभा निवडणुकांपूर्वी मला त्यांनी भेटायला बोलावले. मी सायंकाळी त्यांच्या बंगल्यावर गेलो. माझ्या मनात प्रचंड कुतूहल होते. पण साहेबांनी थेट मुद्याला हात घालत सांगितले की आम्हा सर्वांची इच्छा आहे की तुम्ही लोकसभा निवडणुका लढवाव्यात! ते ऐकून मी काहीसा स्तब्ध झालो आणि म्हणालो, ‘हे अनपेक्षित आहे. मी याबाबत कधीही विचार केलेला नाही.’ तोवर त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, ‘तुम्ही किती वर्षे हे काम करणार आहात? आज जिथपर्यंत पोचायचे होते तिथवर तुम्ही पोहोचला आहात. जे मिळवायचे होते ते मिळवले आहे. आता तुम्ही येणाऱया 10 वर्षांत राजकारणात सक्रिय झाले पाहिजे….’ अशा अनेक गोष्टी ते समजावून सांगत होते. मी शांतपणाने ऐकत होतो. आठ दिवसांनी मी त्यांना माझा नकार फोनवरून कळवला. यावर त्यांनी ‘ठीक आहे’ एवढेच उत्तर दिले. पण माझ्यासारख्या व्यक्तीबाबत त्यांनी हा विचार केला याचेच मला अप्रूप वाटते. साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची ही खासियत आहे. गुणग्राहकता हा त्यांचा एक खूप मोठा गुण आहे.
समारोप करताना आजवरच्या निरीक्षणातून मी एवढेच म्हणेन की, दुर्दम्य इच्छाशक्ती, अफाट कष्टाची तयारी, प्रचंड आत्मविश्वास, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्याची ताकद, जबाबदारी सोपवताना दाखवावयाचा विश्वास असे पवार साहेबांमध्ये असणारे अनेक गुण राजकारणातील व्यक्तींनी अंगिकारणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत ज्या लोकांना साहेबांनी राजकारणात आणले, मोठे केले, पदे दिली त्यांनी त्यांची साथ सोडली. दगाबाजी केली. परंतु त्यांच्याविरोधातही साहेबांनी पातळी सोडून कधीही टीकाटिप्पणी केली नाही. त्यांच्यावर कितीही जहरी टीका झाली तरी त्या टीकेला त्याच भाषेत ते कधी उत्तर देत नाहीत. हा सुसंस्कृतपणा राजकारणात महत्त्वाचा आहे.
जाता जाता एक नक्की सांगावेसे वाटते की, साहेबांनी आपल्यावर होणाऱया खोटय़ा आरोपांविरोधात थेटपणाने बोलणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्याविषयीचा संशयकल्लोळ वाढवत नेला जातो. त्यांच्याविषयी गैरसमज पसरवले जातात. मध्यंतरी दाऊद इब्राहिमबाबत त्यांच्यावर आरोप झाले तेव्हाही मी त्यांना हे सांगितले होते. लोकसभा निवडणुकांदरम्यान ईडीची नोटीस आल्यानंतर पवार साहेबांनी ज्याप्रमाणे स्वतःच ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्यावरील आरोपांची राळ शांत केली, तशीच भूमिका त्यांनी घेतली पाहिजे असे वाटते.
ऍड. उज्ज्वल निकम
(शब्दांकन : हेमचंद्र फडके)








