प्रतिनिधी/ सातारा
दरवर्षीप्रमाणे 8 मेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो शरद पवारसाहेब हे दुपारपासून जिह्यात डेरेदाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून शासकीय विश्रामगृहात रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱयांसमवेत रात्री उशिरापर्यंत कमराबंद अशी चर्चा सुरु होती. शासकीय विश्रामगृहाबरोबरच सातारा शहराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. पवारसाहेब जिह्यात आल्याने राजकीय घडामोडींना वेग आलेला असून विधानपरिषदेचे सभापती रामराजेंसह इतर जिह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जिल्हा् बँकेत तळ आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट देऊन सातारा पोलीस दलाचा आढावा घेतला. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी वाढे येथे कार्यक्रमाला हजेरी लावली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे दरवर्षी 8 मे ला साताऱयात मुक्कामी असतात. दि. 9 रोजी दिवसभर कार्यक्रमात व्यस्त असतात. राजकीय घडामोडी घडत असतात. दरवर्षीप्रमाणे पवासाहेबांचे आगमन दुपारी उशिरा साताऱयात झाले. त्यांची गाडी शासकीय विश्रामगृहाच्या दिशेने रवाना झाली. अगोदरच सकाळपासून रयत शिक्षण संस्थेमधील पदाधिकारी, अधिकारी त्यांचे वाट पहात बसले होते. पवारसाहेब आल्यानंतर सातारा पोलिसांसह अधिकाऱयांनी त्यांचे स्वागत केले. शासकीय विश्रामगृहातील सर्वात चांगल्या सुटमध्ये पवारसाहेबांसोबत रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱयांची चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
शासकीय विश्रामगृहाला पूर्णपणे कडक असा पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे नेमक्या काय घडामोडी झाल्या हे समजू शकले नाही. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेही सातारा जिह्यात आगमन झाले. त्यांनीही शासकीय विश्रामगृहात हजेरी लावून तेथे सातारा पोलिसांचा प्रोटोकॉल स्वीकारुन सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे त्यांच्या वाहनांचा ताफा रवाना झाला. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट देऊन आढावा घेतला. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचेही जिह्यात आगमन झाले असून ते सातारा तालुक्यातील वाढे येथील कार्यक्रमस्थळी हजर होते. त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन झाले.
जिल्हा बँकेत रामराजेंसह इतर नेत्यांचा तळ
जिल्हा बँकेत दुपारीच विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका, भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह मान्यवरांनी तळ ठोकला होता. जिह्यातील विविध मुद्यावर त्यांच्यामध्ये वरच्या मजल्यावर चर्चा सुरु होती. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्यामध्ये या चर्चा सुरु होत्या. दरम्यान, पवारसाहेबांकडून नेमक्या काय सूचना येणार, उद्याच्या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमापासून ते दुपारपर्यंत कसे नियोजन आहे याची माहिती त्यांनी घेतल्याचे समजते.
शहरात कडक पोलीस बंदोबस्त
सातारा शहराला कोरोनानंतर प्रथमच मोठा बंदोबस्त असल्याचे सातारकरांनी पाहिले. अगदी महामार्गापासून ते शहरातील प्रत्येक चौकाचौकात वाहतूक पोलिसांपासून ते खाकी वर्दीतील पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळत होता. सातारा शहर, तालुका, शाहुपूरी या पोलीस ठाण्याबरोबरच जिह्यातील इतर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारीही बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले असून त्यांची डय़ुटी ठिकठिकाणी लावण्यात आली आहे. त्यामुळे सातारा शहराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.
शासकीय विश्रामगृहावरील घडामोडीकडे सगळय़ांच्या नजरा
रयत शिक्षण संस्थेच्या कौन्सिलच्या अनुषंगाने काही महत्वपूर्ण निणर्य दरवर्षी घेतले जात असतात. त्याच अनुषंगाने शासकीय विश्रामगृहात उशिरापर्यंत बैठक सुरु होती. पवारसाहेब नेमक्या काय सूचना करतात?, कोणावर सचिवपदाची जबाबदारी टाकणार याच्याकडेच सगळय़ांच्या नजरा असून उद्या दुपारपर्यंत नावे समजतील अशीही चर्चा सुरु होती.









