प्रतिनिधी / म्हसवड :
पळशी (ता-माण) येथील जाधव वस्ती येथे दादासाहेब गुलाबराव जाधव यांच्या राहत्या घरात शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घरगुती गॅसचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दादासाहेब गुलाबराव जाधव हे येथील जाधव वस्ती येथे त्यांच्या कुटुंबासमवेत छपराच्या घरात राहतात. त्यांच्या पत्नी सकाळी साडेआठच्या सुमारास स्वयंपाक करत होत्या. गॅस सुरू करताच रेग्युलेटरने अचानक पेट घेतला. त्यामुळे सर्वजण घाबरून घराबाहेर पळाले. अवघ्या काही क्षणातच गॅसचा मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून शेजारील ग्रामस्थ मदतीला धावले व आग विझविण्याचा प्रयत्न केला पण गवती छप्पर असल्याने आग आटोक्यात आली नाही. स्फोटाने घराच्या भिंतींचीही मोठय़ा प्रमाणात पडझड झाली असून, घरातील सर्व साहित्य, धान्य, कागदपत्रे, दहा हजाराची रोकड, दीड तोळे सोने, मुलांची वह्या पुस्तके आदी साहित्य जळून खाक झाले असून जाधव कुटूंब उघडय़ावर पडले आहे. घटनेचे वृत्त समजताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. स्फोटात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.









