अंगणवाडी कार्यकर्त्यांची मागणी : जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येते. लहान मुलांना घरोघरी जाऊन पल्स पोलिओचा डोस दिला जातो. या मोहिमेमध्ये अंगणवाडी कार्यकर्त्या रात्रंदिवस काम करत असतात. मात्र, त्यांना त्याचे वेतन दिले जात नाही. गेल्या तीन वर्षांपासून आम्हाला वेतनच नाही. तेव्हा तातडीने आम्हाला वेतन द्यावे, अशी मागणी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे गुरुवारी केली.
पोलिओ मुक्त भारत करण्यासाठी केंद्र सरकार पोलिओ डोस मोहीम राबवित असते. दरवषी ही मोहीम राबविली जाते. अंगणवाडीतील कार्यकर्त्यांनी बेळगुंदी, गणेशपूर, हिंडलगा, मंडोळी, हंगरगा यासह इतर परिसरात घरोघरी फिरून काम केले आहे. 2019 पासून सलग तीन वर्षे काम केले असताना अद्याप तेव्हापासूनचे वेतन दिले गेलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाकाळात देखील हे काम आम्ही केले आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करावा आणि आम्हाला मागील वेतन द्यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
कोरोनाकाळात आपल्याकडीलच मास्क, सॅनिटायझर, हातमोजे याचा वापर आम्ही केला आहे. आम्हाला या वस्तूदेखील दिल्या गेल्या नाहीत. पदरमोड करून आम्ही या वस्तू खरेदी केल्या आणि कोरोनाकाळात काम केले. घरातून कोणीही बाहेर पडत नव्हते. मात्र, आम्ही जिवाची बाजी लावली आहे. तरीदेखील आम्हाला वेतन देण्यात येत नाही, हे दुर्दैव आहे. यावेळी अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या वतीने महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मंदा नेवगी, खजिनदार मीनाक्षी डफळे, अंगणवाडी कार्यकर्त्या सुनीता टुमरी, सुवर्णा मोरे, आशा महागावकर, नागोली तारिहाळकर यांच्यासह महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.









