सर्व संबंधित यंत्रणांना एकत्रित कारवाईच्या पालकमंत्र्यांच्या सूचना
कुचराई करणाऱया अधिकाऱयांवर कारवाई
प्रतिनिधी / ओरोस:
एलईडी पर्ससीन मासेमारीबाबतची भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली असून पर्ससीन मासेमारी बंद करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी एकत्रित काम करावे, असे आदेश दिले आहेत. पारंपरिक मच्छीमारांच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्याने कोणत्याही प्रकारची कुचराई झाल्यास संबंधित अधिकाऱयांवर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मच्छीमार बांधवांच्या शिष्टमंडळाने रविकरण तोरसकर यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गनगरी येथे उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱयांना पर्ससीनबाबत कडक भूमिका घेण्याचे आदेश दिले. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आदी उपस्थित होते.
पर्ससीन मासेमारी कोणत्याही प्रकारे सुरू राहता नये. यासाठी फास्टट्रकवर निर्णय घेण्याची गरज असून सद्यस्थितीत पोलीस दलाने विशेष प्रयत्न करावा. अचानक भेटी देऊन सापडण्याऱयांवर कारवाई करावी. पोलिसांनी वा कोणत्याही शासकीय यंत्रणेने पकडून दिलेला ट्रॉलर लवकर सोडून देण्यात येऊ नये, असा मुद्दा यावेळी अधीक्षक गेडाम यांनी उपस्थित केला. ही बाब गांभीर्याने घेत असे कारवाईचे ट्रॉलर लवकर न सोडण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला पालकमंत्र्यांनी दिले.
समुद्रात असणाऱया या पर्ससीन बोटींचा पाठलाग करून कारवाई करता येईल, अशा बोटी लवकरच पोलीस दलात दाखल होत आहेत. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी पोलीस यंत्रणा मच्छीमारांबरोबर राहील, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
तहसीलदार, मत्स्य आणि पोलीस या तीनही शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने काम केले तरच हे थांबणार आहे. त्यामुळे एकत्रित काम करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हाधिकाऱयांनीही यात लक्ष घालावे, अशी सूचना त्यांनी केली. ड्रोन कॅमेऱयाच्या सहाय्याने लक्ष ठेवणे शक्य नसल्याने मच्छीमारांची ही मागणी मात्र पूर्ण करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.








