प्रतिनिधी /पणजी
पर्रा येथील रवींद्र कृष्णा पर्रीकर यांच्या निवासस्थानी पाच दिवसीय लक्ष्मी नारायण पूजन उत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. राज्यात दिवाळीनिमित्त लक्ष्मी पूजन घरोघरी मोठय़ा उत्सवात साजरे केले जाते. दुकानदार आपल्या दुकानात तसेच इतर व्यावसायिकही लक्ष्मी पूजन करतात. काहीजण एक दिवस लक्ष्मी पूजन करतात तर काही जणांकडे पाच दिवस लक्ष्मी पूजनाचा उत्सव साजरा केला जातो.
लक्ष्मी नारायण पूजन उत्सव हा राज्यात ठराविक ठिकाणीच साजरा केला जातो. पर्रा येथील रवींद्र पर्रीकर कुटुंबियांतर्फे लक्ष्मी नारायण उत्सव गेल्या 65 वर्षांपासून मोठय़ा भक्तीभावाने साजरा केला जात आहे. माजी केंद्रीयमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कुटुंबियातर्फे त्यांच्या पर्रा येथील मूळ घरात हा उत्सव साजरा केला जातो. तसेच पर्रा येथील प्रभाकर सिरसाट यांच्या निवासस्थानातही लक्ष्मी नारायण उत्सव साजरा केला जातो.
गणेश चतुर्थी उत्सवासारखाच लक्ष्मी नारायण उत्सवाचा थाट असतो. लक्ष्मी पूजना दिवशी विशेष अशी लक्ष्मीनारायणाची मूर्ता आणून पारंपरिक पद्धतीने पूजन केले जाते. नंतर पाच दिवस भजन, कीर्तन, आरती आदी कार्यक्रम होतात. पाचव्या दिवशी गणपती विसर्जन करतात त्याचपद्धतीने श्रींचे विसर्जन केले जाते.
गेली 65 वर्षाची परंपरा
रवींद्र कृष्णा पर्रीकर कुटुंबियातर्फे गेल्या 65 वर्षांपासून लक्ष्मी नारायणाचे पूजन उत्सव त्यांच्या मूळ निवासस्थानी साजरा केला जात आहे. अगोदरच्या काळात हा उत्सव नऊ दिवस किंवा सात साजरा केला जात होता. त्या काळात भजन, कीर्तन तसेच नाटक किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. कालांतराने घरातील अधिकाधिक लोक कामानिमित्त किंवा अन्य कारणामुळे इतर ठिकाणी स्थलांतरित झाल्याने हा उत्सव पाच दिवसाचा करण्यात आला आहे. उत्सवाच्या स्वरूपात बदल झाला असला तरी भक्तिभाव व श्रद्धा आजही तीच आहे.
गोमंतकीय जनता ही भाविक, श्रद्धाळू अशी मानली जाते. देवदेवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोमंतकाच्या भूमीतील घराघरात तसेच मंदिरांतून व इतर सार्वजनिक ठिकाणी अनेक देवदेवतांचे दर वर्षी विविध उत्सव साजरे केले जातात. गोव्यात सुमारे साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांनी राज्य केले. या राजवटीत जनतेचा अनन्वीत छळ झाला. तसेच येथील पारंपरिक उत्सव बंद करण्याचा प्रयत्न झाला. अनेक मंदिरेही पाडण्यात आली. बाटाबाटीचे प्रकार झाले. त्यातल्या त्यात अशाप्रकारे उत्सवाची परंपरा पर्रीकर कुटुंबियांबरोबरच अन्य गोमंतकीयांनीही जपलेली आहे.









