बेळगाव / प्रतिनिधी
पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत जम्मू येथून निघालेले पर्यावरणप्रेमी नरपतसिंह राजपुरोहित 15 हजार 990 कि.मी.चा सायकल प्रवास करून मंगळवारी बेळगावमध्ये दाखल झाले. आजवर 9 राज्ये व 4 केंद्रशासित राज्यांमध्ये सायकलवरून जावून त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. बेळगावमध्ये आगमन होताच राजपुरोहित समाज व रघुनाथ सेनेच्या सदस्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
27 जानेवारी 2019 रोजी त्यांनी जम्मू येथून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक असा त्यांनी आजवर प्रवास केला आहे. संपूर्ण भारत त्यांना सायकलवरून फिरून पाहायचा आहे. मूळचे राजस्थान येथील असलेल्या राजपुरोहित यांनी आपल्या गावातील पाण्याची समस्या पाहून आपण त्यासाठी काम केले पाहिजे या ऊर्जेतून कामाला सुरुवात केली.
दररोज 2 रोपे लावण्याचा संकल्प
फिरताना वाटेमध्ये रोज दोन रोपे लावत असतो. त्यातील 70 टक्के झाडे सुरक्षित असल्याचे ते सांगतात. आजवर त्यांनी 113 जखमी हरणांना पुनर्जीवन दिले आहे. याचबरोबर 4 मोर, 4 ससे, 1 निलगाय यांना जीवदान दिले आहे. बहिणीच्या लग्नात हुंडा न देता सासरकडच्यांना रोपे दिली. आलेल्या पाहुण्यांनाही रोपे देऊन सन्मान करण्यात आला. अशीच पद्धत इतरांनीही अवलंबिल्यास भारत सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही.
पाण्याचे महत्त्व वेळीच जाणा
हवा प्रदूषणाचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली हे शहर बनले आहे. काही दिवसांनी शुद्ध हवा मिळण्यासाठी त्या ठिकाणी पैसे द्यावे लागतील, अशी वेळ येण्याची शक्मयता आहे. याबरोबरच ऑस्ट्रेलिया येथे लागलेल्या आगीनंतर ती विझविण्यासाठी प्राण्यांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे प्रथ्वीवर पाणी शिल्लक राहिले नाही तर मानवच मानवाला संपवेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
बेळगावमध्ये राजपुरोहित समाजाच्यावतीने देविदास राजपुरोहित, पृथ्वीसिंग राजपुरोहित, कानसेन राजपुरोहित, संपतसेन राजपुरोहित, चंदसेन राजपुरोहित यासह इतर उपस्थित होते.









