युथ ऑफ गोवा संघटनेची भूमिका
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील पर्यावरणाची हानी करणाऱया प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला जाईल त्यासाठी गोव्याच्या कानाकोपऱयातील युवकांना एकत्र करून जनजागृती केली जाईल, असे युथ ऑफ गोवा या संघटनेच्यावतीने शॉन गुदिन्हो यांनी सांगितले.
मोले येथील तन्मार वीज प्रकल्प, रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प, म्हापसा शेल्डे वीज वाहिनी प्रकल्प अशा अनेक प्रकल्पांना विरोध जाहीर करताना या प्रकल्पांमुळे झाडांची कत्तल होणार असल्याचे श्री. गुदिन्हो म्हणाले. सध्या गोव्यात 33 टक्के वनक्षेत्र आहे. सध्या होऊ घातलेले तीन प्रकल्प जर पूर्ण झाले तर वन क्षेत्र 30 टक्क्यांहून खाली येईल. महावीर अभयारण्य व मोले राष्ट्रीय उद्यानाला धोका निर्माण होईल, असे श्री. गुदिन्हो म्हणाले.
सध्या जे प्रकल्प सुरू आहेत ते केंद्र सरकारचे आहेत. ते केंद्र सरकारचे आहेत, असे म्हणून गोवा सरकारला त्यातून बाजूला सरकता येणार नाही. पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प गोव्याला नको आहेत, हे गोवा सरकारने स्पष्ट करायला हवे. जोपर्यंत हे प्रकल्प रद्द होत नाहीत तोपर्यंत गोव्यातील तरुण गप्प बसणार नाही, असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला श्री. गुदिन्हो यांच्यासोबत, गेबनेटा डिक्रूझ, लियांडर फर्नांडिस, मर्विन परेरा, वालेरिओ आकोन्सो, दारिना लोबो, मॅटसन मिरांडा, शबिरा शेख, केरिया फर्नांडिस, लिरोय फर्नांडिस, मेरी फर्नांडिस, रोमियो डायस यांनी विचार मांडले.









