पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी व्यक्त केले मत: तज्ञांची समिती स्थापन, समितीच्या सूचनांनुसार पुढील वाटचाल ठरणार
प्रसाद नागवेकर, मडगाव
‘कोविड-19’च्या साथीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा आर्थिक कणा असलेला पर्यटन व्यवसायाला झळ बसली असून यापुढे हा व्यवसाय कसा पुढे न्यायचा हे पाहताना आम्हाला शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. यासंदर्भात तज्ञ मंडळीची एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यांच्या सूचनांनुसार पुढील वाटचाल ठरविली जाणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी ‘तरुण भारत’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिली.
कोरोना विषाणूमुळे जगभरासह भारतात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प होऊन आर्थिक व्यवहारांना ब्रेक लागले आहेत. पर्यटन व्यवसाय देशी-विदेशी पर्यटकांवर अवलंबून असल्याने जोपर्यंत पर्यटक येणार नाहीत तोपर्यंत हा व्यवसाय ठप्पच राहणार आहे, याकडे आजगावकर यांनी लक्ष वेधले. ‘कोविड-19’चा फैलाव रोखण्यासाठी जोपर्यंत प्रभावी लस वा औषध तयार होत नाही तोपर्यंत पर्यटन व्यवसाय सुरू होऊ शकणार नसल्याचे दिसून येत आहे, असे ते म्हणाले.
साठच्या दशकासारखे पर्यटन हवे
पर्यटन व्यवसायामुळे गोव्याला चांगले नाव मिळाले असले, तरी काही अप्रिय घटनांमुळे गोव्याचे नाव बदनाम झाले होते हे विसरून चालणार नाही. त्यासाठी 60 च्या दशकात गोव्यात जसा पर्यटन व्यवसाय सुरू होता त्या धर्तीवर आता हा व्यवसाय होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारचे प्रयत्न असून तज्ञमंडळी यासंदर्भात मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आजगावकर यांनी दिली.
गोवा आपले फेसाळते किनारे, नद्या, झरे व हिरवळ अशा नैसर्गिक सौंदर्यामुळे तसेच येथील चर्चेस, मंदिर याद्वारे पर्यटकांवर भुरळ घालत आला आहे. ही नैसर्गिक संपदा गोव्याकडे असल्याने अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे, असे आजगावकर यांनी सांगितले. सरासरी 60 लाख देशी व 20 लाख विदेशी पर्यटक गोव्यात भेट देत आले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अंदाधुंदी करणारे पर्यटक नकोत
आम्हाला अंदाधुंदी करणारे पर्यटक नको आहेत. अमलीपदार्थ व अन्य बाबींचा झालेला शिरकाव बंद करायचा आहे. उघडय़ावर स्वतः जेवण तयार करणारे पर्यटक आम्हाला नकोत. तसेच पर्यटकांची पाठ धरणारे बेकायदेशीर विपेते, भिकारी यांना दूर ठेवायचे असून त्याकरिता नियम तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार यापुढे कृती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पातळीवर कोरोनाची साथ रोखण्याच्यादृष्टीने चांगले कार्य केलेले आहे व आता आर्थिक व्यवहारांना कशी गती द्यायची यावर त्यांचा अभ्यास चालू आहे. गोव्यातही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चांगले कार्य केले असून त्यामुळे येथे भरपूर जागृती होऊन गोवा आज हिरव्या विभागात आहे. पर्यटन क्षेत्र कसे पुढे न्यायचे यावर सखोल अभ्यास त्यांच्या नेतृत्वाखाली सध्या चालू आहे, असे आजगावकर म्हणाले.
पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांना पॅकेज देण्यावर भर पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याने त्यावर अवलंबून असलेले लहान-मोठे व्यावसायिक सध्या हवालदिल बनले आहेत. केंद्र सरकारने देशभरातील अशा झळ बसलेल्या व्यवसायांकरिता 1.75 लाख कोटींची तरतूद केली आहे. पर्यटन व्यवसायाशी संबंधित असलेल्या व्यावसायिकांना पॅकेज उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न असून त्यासाठी मुख्य सचिव, पर्यटन संचालक, पर्यटन सचिव, अन्य तज्ञ यांचा समावेश असलेली समिती सर्व निकषांचा विचार करून पॅकेजसंदर्भात सूचना करणार आहे, अशी माहिती आजगावकर यांनी दिली. केंद्राला हा अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार पॅकेजसाठी केंद्राकडून निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शॅक्सचालक, टॅक्सीचालक, मोटारसायकल पायलट, हॉटेल उद्योग यांना झळ बसली आहे. या सर्वांना कशा प्रकारे पॅकेज मिळवून देता येईल यावर सध्या भर देण्यात आला असल्याची माहिती आजगावकर यांनी दिली.









