प्राचीन काळी मोजकेच प्रवासी देश-विदेशात हिंडत आणि राजा-महाराजांच्या दरबारात आपले ज्ञान, अनुभव सांगत. हे देशाटन त्याकाळी ज्ञानापुरते असले तरी नंतरच्या काळात ते व्यापार आणि पर्यटन यासह जीवनाच्या सर्व अंगावर प्रभावी ठरले. दुर्दैवाने गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे पर्यटनासह अवघे विश्व आक्रसले आहे. जागतिक मंदीला तोंड देत आहे. पण ही बाब तात्पुरती आहे. जेव्हा ही महामारी संपूर्ण जगातून संपेल तेव्हा पर्यटनाची महालाट आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आज सोमवारी 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन साजरा होतो आहे. लॉकडाऊन नंतर, महामारीनंतर हळूहळू मिटलेले पंख भरारीसाठी आसुसलेले दिसत आहेत. अशावेळी पर्यटन हा विषय आपण विशेषत्वाने ध्यानात घेतला आहे. जगात असे अनेक देश आहेत जेथे पर्यटन हा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडेही केरळ असो राजस्थान किंवा काश्मिर-गोवा ही राज्ये पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. निळेशार समुद्रकिनारे, उंचच उंच डोंगर रांगा, सप्तरंगांची उधळण करणारा निसर्ग आणि विविध धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे, खाण्या-पिण्याच्या सवयी, सण, उत्सव, जैव विविधता त्यामुळे भारतात पर्यटनाला खूप मोठा वाव आहे. पर्यटन उद्योगात मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते. अनेक संधी आहेत. वेरूळचे लेणे असो किंवा हिमालयाचे दर्शन असो, वाघा बॉर्डर असो अथवा हवामहल असो. मनाला भुरळ टाकणारी पर्यटनस्थळे आहेत. अनेकवेळी आपल्याच देशातील माणसे विदेशी सहली करतात. पण त्यांनी त्यांच्या भागातील पर्यटनस्थळे कधी बघितलेलीसुद्धा नसतात किंवा त्याबद्दल त्यांना माहितीदेखील नसते. ओघानेच वर्षभरात आपल्या नेहमीच्या आयुष्यातून पर्यटनासाठी वेळ आणि थोडा खर्च केला पाहिजे. पर्यटक विविध गोष्टींसाठी प्रवास करत असतात. विरंगुळा, अभ्यास, व्यापार, संशोधन, संधान यासाठी प्रवास होत असतात. आणि पर्यटन व्यवसाय वाढणे यासाठी दृष्टी असावी लागते. पर्यटकांना सोई-सुविधा लागतात, सुरक्षा लागते, मार्गदर्शक लागतात. खाद्यपदार्थ, वेशभूषा यातील विविधता लागते आणि नेत्रदीपक निसर्ग, वास्तू आणि खरेदीसाठी बाजारपेठ लागते. ओघानेच पर्यटन कंपन्यांपासून हॉटेलपर्यंत आणि बँकिंगपासून बाजारपेठेपर्यंत सर्वांना यातून व्यवसाय मिळतो. जगात आणि देशातील काही राज्यात पर्यटन झपाटय़ाने वाढत असले तरी पर्यटन या विषयाला महाराष्ट्रात म्हणावे तितके महत्त्व आलेले नाही. महाराष्ट्राला मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. सहय़ाद्रीची पर्वत रांग आहे. लेणी, देवळे आहेतच पण ताड-माडाचे कोकण आणि छत्रपती शिवरायांच्या पावनस्पर्शाने पुनीत अनेक गडकोट महाराष्ट्राच्या विविध भागात आहेत. पर्यटक या गोष्टी बघायला येतात पण पर्यटन हा व्यवसाय म्हणावा तसा रूजलेला दिसून येत नाही. विशेष करून दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि कोकणात त्यादृष्टीने शासनाची पावले पडलेली नाहीत. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी साहसी पर्यटनासाठी काही निर्णय घेतले आहेत. साहसी पर्यटन धोरणांतर्गत साहसी खेळ, अभयारण्यातील जीप सफारी या संदर्भात धोरण आखले जाणार आहे. साहसी पर्यटनाला त्यातून चालना दिली जाणार आहे. यापूर्वीही कृषी पर्यटन वगैरे निर्णय झाले पण ठरावीक ठिकाणे सोडली तर पर्यटनाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. पर्यटन विकास महामंडळ त्यासाठी गेली कित्येक वर्षे कार्यरत आहे. पण राजस्थान, गोवा, केरळ या राज्यांनी ब्रँड ऍबेसिडर नेमून जसा पर्यटनाच्याबाबतीत विकास साधला आहे तसा महाराष्ट्रात आणि विशेष करून दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात झालेला नाही. बेळगावचे मांडे, पुंदा, सांगलीचे भडंग, कृष्णा काठाचे दूध-दही आणि वांगी, सोलापूरची कडक भाकरी व बाजार आमटी, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा. याच बरोबर कोकणातील मासे, समुद्र किनारे, गणपतीपुळे, मालवण, सिंधुदुर्ग याकडे जगातील पर्यटक वळतील असे धोरण व पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. महाराष्ट्राची पुरणपोळी, चुलीवरचे मटण, मोदक आणि लाडू, पुणेरी चिवडा आणि बेळगावचे मांडे, कुंदा पर्यटकांना उपलब्ध झाले पाहिजेत. महाराष्ट्रात भाजी-भाकरी, भरलेले वांगे, दही-खरडा सहज उपलब्ध नाही. पंजाबी रोटी आणि बंगाली मिठाई हेच हॉटेलात मिळणार असेल तर खवय्ये महाराष्ट्राकडे आकृष्ट होणार नाहीत. पर्यटन स्थळाची स्वच्छता, निवाऱयाच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा यासाठीही जाणीवपूर्वक पावले टाकली पाहिजेत. महाराष्ट्राची नऊवारी आणि पैठणी पर्यटकांनी खरेदी केली पाहिजे. राजस्थानमध्ये कोणतीही बाग बघायला गेले तर तेथे पाच-दहा रु. तिकीट आहे. आतमध्ये विविधता आहे, कारंजे आहेत, कठपुतली किंवा स्थानिक लोककलाकारांचे अर्ध्या तासाचे शो आहेत. पर्यटक तिकीट काढून ते बघतात. विविध राजे आणि राजघराणी यांची वस्तुसंग्रहालये आहेत. पॅलेस आहेत. हे सारे सरकारने राखले आहे. व पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. पर्यटक तिकीट काढून ते पाहतात. तेथे गाईड आहेत, छायाचित्रकार आहेत, प्रवासी गाडय़ा आहेत, करमणुकीची केंद्रे आहेत. यातून रोजगार आणि व्यापार होतो. तलाव, किल्ले, महाल, पुतळे, बागा, वस्तुसंग्रहालये सुशोभित ठेवली जातात. तेथे व्यापार आणि रिक्षा-टॅक्सीपासून लॉजिंगपर्यंत सर्वांना एक शिस्त व आदरातिथ्य अशी शिकवण आहे. महाराष्ट्राने हे केले पाहिजे. गोव्यात पर्यटन बऱयापैकी आहे तेथे विस्ताराला संधी आहे. पर्यटनातून रोजगार, ग्रामीण विकास, आर्थिक समृद्धी आणि परंपरांचे जतन शक्य आहे. देश-विदेशातून पर्यटक येतील यासाठी जाणीवपूर्वक व सातत्याने पावले टाकली पाहिजेत. नव्या आर्थिक सुधारणा आणि कोरोना नंतरचे जग या पार्श्वभूमीवर हा विषय महत्त्वपूर्ण बनला आहे. कोरोना महामारीमुळे गेले काही महिने कोंडलेले, कंटाळलेले जग जेव्हा मुक्त होईल तेव्हा आपण तयार असले
पाहिजे.
Previous Articleकोजिमाशि कर्ज मर्यादा 35 लाख करणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








