सावंतवाडी/प्रतिनिधी-
लॉकडाऊनच्या नावाखाली छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची छळवणूक होत आहे. सर्व व्यापाऱ्याने आता एकजुटीने राहायला हवे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा पर्यटन व्यापारी महासंघ जे कार्य करत आहे ते निश्चितपणे महाराष्ट्राला एक नवी दिशा देणारे आहे. या पर्यटन महासंघाच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे, असे मत राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील माजगाव येथे सावंत यांच्या हॉटेलमध्ये देण्यात आलेल्या सावंतवाडी तालुका पर्यटन महासंघच्या वतीने व्यापाऱ्यांसाठी एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून खांडेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी तालुका पर्यटन महासंघाचे अध्यक्ष जितू सावंत, जिल्हा पर्यटन महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, सचिव नकुल पार्सेकर, डी. के. सावंत, उपसरपंच संजय कांसे, उपसरपंच रामचंद्र चरटकर, बाबल वाडकर, परवेश सय्यद, नंदू तारी, सत्यम सावंत, राजेश लाड आदी उपस्थित होते.









