प्रतिनिधी/ पणजी
येत्या 27 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया पर्यटन मौसमापूर्वी सध्या कोरोनामुळे मोडकळीस आलेल्या उद्योगाला चालना देण्यासाठी कळंगुटचे आमदार तथा कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन विविध मागण्या पेश केल्या आहेत. वेब पोर्टलवरील बंद झालेले बुकिंग पुन्हा सुरू करण्यासाठी घातलेल्या अटी रद्द करणे तसेच शॅक चालकांना केवळ 50 टक्के नोंदणी शुल्क आकारावे, अशा मागण्यांचा यात समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी यासर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
मंत्री मायकल लोबो यांनी सायंकाळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची त्यांच्या आल्तिनोवरील महालक्ष्मी बंगल्यावर जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर पर्यटन विषयक उद्योगाला प्रोत्साहन व प्राधान्य देण्याकरीता काही मागण्या पेश केल्या.
वेब पोर्टलवरील बुकिंग बंद झाल्याने समस्या
वेब पोर्टलवरील जगभरातील कोणत्याही पर्यटकासाठी गोव्यातील हॉटेले, गेस्ट रूम्स व तत्सम व्यवस्थेकरीता अनेक पर्यटन क्षेत्रातील कंपन्या बुकिंग करायच्या. परंतु गोवा सरकारला जीएसटी व तत्सम कर मिळत नाही या सबबीखाली गोवा सरकारने काही महिन्यांपूर्वी अनेक निर्बंध लागू केले. परिणामी हॉटेलातील खोल्या, गेस्ट हाऊस वगैरे बुकिंग करणाऱया खासगी क्षेत्रातील नामवंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील कंपन्यांसमोर मोठय़ा अडचणी निर्माण झाल्या.
वेब पोर्टल बुकिंग करणाऱयांसाठी दारे मोकळी
या कंपन्यांनी गोव्यातील हॉटेल खोल्यांचे बुकिंग बंद केले. त्याचा फटका येथील हॉटेल व्यवसायावर तथा थेट पर्यटन व्यवसायावर झाला. कंपन्याना बुकिंग करू द्या, जो काही जीएसटी यायचा आहे तो हॉटेल चालकांनी पर्यटकांकडून वसुल करून सरकारला भरला पाहिजे. त्यासाठी हॉटेलचालक जे कर भरत नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कंपन्यांची काही चूक नाही हे लोबो यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना बोलावून नव्याने आदेश जारी करून बुकिंग करणाऱयांसाठी दारे मोकळी केली.
शॅक फी 50 टक्के पर्यंत खाली आणा
राज्यात सध्या समुद्रकिनारी येणाऱया पर्यटकांच्या सोयीकरीता जे शॅक उभारण्यासाठी परवाने द्यावयाचे आहेत, ज्यांना मिळालेले आहेत त्यांच्याकडून यावर्षी केवळ 50 टक्केच फी आकारली जावी अशी मागणी मंत्री मायकल लोबो यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. शॅक चालविणे यावर्षी परवडणार नाही. तसेच किती पर्यटक येतील हे कळायला मार्ग नाही. एकूण 356 शॅक परवान्यांपैकी यावर्षी अवघेच काही जण ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये शॅक्स उभारतील. पर्यटक किती येतात याचा अंदाज घेऊन उर्वरीत शॅकचालक डिसेंबरमध्ये शॅक उभारतील, तोपर्यंत त्यांना मंजूर केलेले परवाने रद्द करू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. सरसकट सर्वच शॅक्स चालकांवर केवळ 50 टक्केच फी लागू करावी, अशी लोबो यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.
कर्ज हप्ते फेडण्यास दोन महिन्यांची मुदत द्या
राज्यात कोरोनामुळे हॉटेल तथा पर्यटक व्यवसाय पूर्णतः ठप्प झाल्यामुळे या व्यवसायाला पुन्हा उजाळा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातभार लावावा. सध्या हॉटेल, रेस्टॉरंट, गेस्टहाऊस व इतर व्यवसायिकांनी बँकामधून कर्जे घेतली होती त्यांनी कर्जाचे हप्ते फेडणे शक्य नाही. कारण ग्राहकच नाहीत. त्यामुळे गेले 4 महिने कर्जाचे हप्ते भरण्यास दिलेली मुदत आता संपली आहे. बँक चालकांनी उद्योजकांकडे पैसे भरण्याचा तगादा लावलेला आहे. राज्यात पर्यटन व्यवसाय पुन्हा कार्यरत होण्यास आणखी 2 महिने लागतील, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भारतीय रिझर्व बँकेला पत्र लिहून पर्यटन उद्योगातील व्यवसायिकांना कर्ज हप्ते भरण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत वाढवून मागावी, अशी मागणी केली असता मुख्यमंत्र्यांनी ही मागणी देखील मान्य केल्याचे मायकल लोबो म्हणाले.









