प्रतिनिधी /काणकोण
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी मठाचे 23 वे स्वामी श्रीमद् विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींच्या महानिर्वाणानंतर मठ परंपरेतील महत्वाच्या धार्मिक कार्यात खंड पडू नये यासाठी श्री रामदेवाच्या कौलप्रसादानुसार शिष्यस्वामी असलेल्या श्रीमद् विद्याधिश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांचा गुरूपीठारोहण सोहळा 30 रोजी संध्याकाळी 3.10 वा. शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे.
त्यानंर लगेच 31 जुलै रोजी मठ परंपरेतील 24 वे प. पू. श्रीमद् विद्याधिशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज व्यासपुजा करून आपला पाचवा आणि पर्तगाळी मठातील तिसऱया चतुर्मासाचा स्वीकार करणार आहेत. या दोन्ही उत्सवात काणकोण तालुक्यातील पर्तगाळी मठाशी संबधित असलेल्या मंदिरांचे अध्यक्ष आणि पर्तगाळी मठाचे विविध भागात जे 33 मठ आहेत त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
सद्याच्या कोरोना महामारीचा विचार करून दोन्ही धार्मिक महत्वाच्या उपक्रमाची सांगता केल्यानंतर सवडीनुसार प. पू. श्री स्वामी महाराज सर्व भाविकांना टप्प्या टप्प्याने स्वामी महाराज भेट देणार आहेत. त्याच बरोबर भक्तजन तसेच मठानुयायांमधील नाते वृद्धिंगत करण्यासाठी मठ परंपरेनुसार विविध भागात संचार करणार आहेत. सद्याचे पावसाळी वातावरण आणि कोरोना महामारीच्या संसर्गामुळे अत्यावश्यक धार्मिक विधी आणि कार्यक्रम अधिक गाजावाजा न करता साजरे करण्याची मनिषा प. पू. स्वामी महाराजांनी व्यक्त केली आहे. हा पीठारोहण सोहळा सर्वांनी आपल्या घरातच बसून पाहावा यासाठी या सोहळय़ाचे थेट प्रक्षेपण करण्याचे प्रयत्न मठ समितीने ठेवले आहेत. अनुकूल परिस्थिती नुसार यापुढे होणारे सर्व कार्यक्रम गुरूच्या कृपाशिर्वादाने आपणा सर्वाना आमंत्रित करून साजरे करण्यात येतील अशी प. पू. स्वामी महाराजांची इच्छा असल्याचे श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या केंद्रिय समितीने कळविले आहे.









