हजारो भाविकांची उपस्थिती, शेवटच्या दिवशी तप्तमुद्रा धारण कार्यक्रम, अखंड भजन
प्रतिनिधी /काणकोण
पर्तगाळी मठाचे 23 वे स्वामी महाराज श्रीमद् विद्याधिराजतीर्थ यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या कार्यक्रमांचा 10 रोजी थाटात समारोप झाला. हरी स्मरण या नावाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमांत हजारो भाविकांनी हजेरी लावून महानिर्वाण झालेले स्वामी महाराज श्रीमद् विद्याधिराजतीर्थ त्याचप्रमाणे मठ परंपरेतील 24 वे स्वामी श्रीमद् विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर यांच्याविषयी असलेली निष्ठा व श्रद्धा दाखविली.
तीन दिवसांचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र तसेच केरळमधून आलेल्या जवळजवळ 500 स्वयंसेवकांनी हे सर्व काम आपल्या घरचेच असल्याप्रमाणे वागून विविध प्रांतांतून आलेले अनुयायी, भाविक यांची उत्कृष्ट सेवा केली, अशा प्रतिक्रिया या कार्यक्रमांना उपस्थिती लावलेल्या कित्येक अनुयायी, भाविकांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या. मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, त्यांच्या पत्नी पल्लवी धेंपे, उपाध्यक्ष आर. आर. कामत, शिवानंद साळगावकर, प्रवास नायक, दिनेश पै (कर्नाटक), महेश नायक, अनिल पै आणि कर्नाटकातील अन्य प्रमुख अनुयायी मागचे कित्येक दिवस हे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडावेत यासाठी या ठिकाणी तळ ठोकून राहिलेले आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त रविवारी या महोत्सवाच्या तिसऱया दिवशी 24 तास अखंड भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गोवा आणि कर्नाटकाच्या विविध भागांतून आलेल्या 20 पेक्षा अधिक भजन पथकांनी भाग घेतला. त्यांनी संपूर्ण पर्तगाळी मठ परिसर संगीतमय आणि भक्तीमय करून सोडला. त्याशिवाय खास आयोजित केलेल्या तप्तमुद्रा धारण या कार्यक्रमांचा हजारो अनुयायांनी लाभ घेतला. स्वतः प. पू. स्वामी महाराजांच्या हस्ते संकल्पपूर्ती केलेल्या अनुयायांचा तप्तमुद्रा धारण कार्यक्रम पार पडला. यात लहान मुलांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग होता. तप्तमुद्रा धारण कार्यक्रम शिस्तीत पार पडण्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी लक्ष दिले होते. संध्याकाळी 6.30 वा. श्री रामदेव, श्री वीर विठ्ठल महापूजेने या तीन दिवसीय कार्यक्रमांची सांगता झाली.
तीन दिवस चाललेले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेषतः कर्नाटक तसेच गोव्यातील मठानुयायांनी जे अपार परिश्रम घेतले आणि पोलीस, वाहतूक, आरोग्य, अग्निशामक दल, वीज आणि अन्य सरकारी खात्यांनी जे भरपूर सहकार्य केले त्याबद्दल मठ समितीने कृतज्ञता व्यक्त केली आहे.









