विजय चौकातील सोहळय़ात विविध बँडने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राजधानी दिल्लीतील विजय चौकात रविवारी संध्याकाळी प्रजासत्ताक दिनाच्या औपचारिक समाप्तीनिमित्त ‘बीटिंग रिट्रीट’ सोहळा पार पडला. या भव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधानही उपस्थित होते. या सोहळय़ावेळी भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित विविध पथकांचे बँडवादन सुरू असताना कोसळलेल्या पाऊसधारांमुळे सोहळय़ात वेगळीच रंगत आली. या सोहळय़ादरम्यान देशातील ‘सर्वात मोठा ड्रोन शो’देखील दाखविण्यात आला. या शोमध्ये 3,500 स्वदेशी ड्रोन सहभागी झाले होते.
राष्ट्रीय राजधानीतील विजय चौकात ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळय़ात लष्करी बँडने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. भारतीय शास्त्रीय रागांवर आधारित टय़ून हे यंदाच्या बीटिंग द रिट्रीट सोहळय़ाचे खास आकर्षण होते. विजय चौकात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमादरम्यान प्रथमच नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकच्या समोरील भागात रंगीबेरंगी दिव्यांच्या माध्यमातून विविध लेझर शो प्रदर्शित करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेतेही या सोहळय़ात सहभागी झाले होते.
लष्कर, नौदल, हवाई दल आणि राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या संगीत बँडद्वारे 29 मनमोहक टय़ून वाजवण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात ‘अग्निवीर’ धुनने तर ‘सारे जहाँ से अच्छा’च्या सुराने कार्यक्रमाची सांगता झाली. लष्कर आणि पोलीस दलाने ‘अलमोरा’, ‘केदारनाथ’, ‘सातपुडा की राणी’, ‘भागीरथी’, ‘कोकण सुंदरी’ यांसारखे मंत्रमुग्ध करणारे सूर वाजवले. वायुसेनेच्या बँडने ‘अपराजेय अर्जुन’, ‘चरखा’, ‘वायू शक्ती’, ‘स्वदेशी’ या धून वाजवल्या. नौदल बँडने ‘एकला चलो रे’, ‘हम रेडी हैं’ आणि ‘जय भारती’ची धून वाजवली. भारतीय लष्कराच्या बँडने ‘शंकनाद’, ‘शेर-ए-जवान’, ‘भूपाल’, ‘अग्रणी भारत’, ‘यंग इंडिया’, ‘कदम कदम बढाये जा’ आणि ‘ये मेरे वतन’ची धून वाजवली.
‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा हे सैन्याच्या बॅरेक्समध्ये परत येण्याचे प्रतीक आहे. या कार्यक्रमाला भारताचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असतात. बीटिंग रिट्रीट सोहळय़ाची परंपरा राजे आणि सम्राटांच्या काळापासून आहे. भारताशिवाय ब्रिटन, कॅनडा, अमेरिका यासह जगातील अनेक देशांमध्ये बीटिंग रिट्रीट समारंभ आयोजित केले जातात. भारतात याची सुरुवात 1950 मध्ये झाली होती.









