भगवान श्रीकृष्णाची स्तुती करताना द्वारकावासी जन पुढे म्हणतात-हे देवा! तू गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून प्रत्यक्ष इंद्रदेवाचे दमन केलेस व तो तुला शरण आला होता, ही तुझी कीर्ति लोकांनी ऐकली आहे. नंदबाबांना तू सोडवून आणलेस तेव्हा वरुणाने तुझे पूजन केले होते हेही लोकांना माहीत आहे. प्रत्यक्ष यमाच्या तावडीतून तू आपला गुरुपुत्र परत आणलास, कुबेराचे पुत्र यमलार्जुनांचा तू उद्धार केलास हेही लोकांना माहीत आहे. हे देवाधिदेव श्रीकृष्णा! तुझी ही कीर्ति ऐकून आता प्रत्यक्ष सहस्त्रकिरण सूर्यदेव तुझे दर्शन घ्यायला येत आहे. भो भो स्वामी पंकजनाभा। तव सान्निध्यसुखवालभा । त्रिजगीं सुरवर दर्शनलाभा। बहुतेक तव भा गिंवसिती । मार्गमाणा श्रुति स्मृति । तो तूं यदुकुळीं गूढस्थिति । नटला आहेसी मनुष्याकृति । जाणोनि गभस्ति येत असे । तूतें पहावयाकारणें । गभस्तीचें येथें येणें ।
ऐसें भाविजे आमुच्या मनें । जाणिजे सर्वज्ञेsं प्रभुत्वें ।
ज्याच्या नाभीतून उगवलेल्या कमळात ब्रह्मदेव वसती करतो अशा पंकजनाभा श्रीकृष्णा! आपल्या चमकणाऱया किरणांनी लोकांचे डोळे दिपवीत हा प्रखरकिरण सूर्य आपल्या दर्शनासाठी येत आहे. हे सर्वज्ञ प्रभो! सर्व श्रे÷ देव त्रैलोक्मयामध्ये आपल्याला प्राप्त करण्याचा मार्ग शोधीत असतात. श्रुति स्मृतिही आपला शोध घेतात. परंतु आपण मनुष्यरूप घेऊन यदुवंशात गुप्तपणे राहिला आहात, हे जाणून आज स्वतः सूर्यनारायण आपल्या दर्शनासाठी येत आहे.
शुक म्हणे गा कौरवपाळा । अज्ञान जनही समान बाळा । बालिशांच्या ऐकोनि बोला । हरि हांसिला आश्चर्यें । अखिलद्रष्टा अंबुजनयन । सर्वसाक्षी सर्वाभिज्ञ । बोलता झाला हास्य करून । काय वचन तयांसी । अहो हा सूर्य नोहे सहसा । तुम्ही लक्षूनि तत्प्रकाशा । भाविला चंडकिरण ऐसा । कोण कैसा नुमजोनी । मणिभूषणें द्योतमान । तुम्हीं भाविला देव म्हणोन । परी हा सत्राजित आपण । द्वारकाभुवन प्रवेशला । कंठाभरणीं स्यमंतक । ज्वलत्करिणीं गमे अर्क । जाऊनि पहा पां सम्यक । मनीं निःशंक होवोनी । ऐसें कथी जंव चक्रपाणि । तंव तो प्रवेशे आत्मसदनीं । पुढें वर्तली जैसी करणी । तेही श्रवणीं अवधारा । महामुनी शुकदेव राजा परिक्षितीला म्हणाले – हे कौरवपालका! अज्ञानि लोकांचे हे बालिश बोल ऐकून भगवान श्रीकृष्ण हसू लागले. अखिलद्रष्टा, सर्वज्ञ असलेल्या भगवंताला काय कळणार नाही? तो भगवान श्रीकृष्ण लोकांना म्हणाला-जनहो ऐका! हा सूर्य नव्हे. सर्वत्र अचानक पसरलेला देदीप्यमान प्रकाश पाहून आपल्याला तसे वाटले. पण हा देव नव्हे. हा तर स्यमंतक मणी आपल्या गळय़ात धारण केलेला सत्राजित असून तो द्वारका नगरीत प्रवेश करत आहे. त्याला प्रत्यक्ष पाहून आपण याची खात्री करून घ्या. देव असे लोकांना सांगत असतानाच सत्राजित द्वारकेतील आपल्या घरात प्रवेश करता झाला. पुढे काय झाले ते पाहा.
सत्राजित निजमंदिरिं । प्रवेशिला आनंदगजरिं ।
तया गृहासी ऐश्वर्यथोरी । शुकवैखरी अनुवादी ।
Ad. देवदत्त परुळेकर








