शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली आज बैठक
प्रतिनिधी/ बेंगळूर
देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातही सरकार याच पद्धतीचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घ्यावी का? घेतली तर कोणत्या स्वरुपात असावी, लेखी परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना एक-दोन दिवस शाळेत बोलावून मूल्यमापन पद्धतीने उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा का? याबाबत निर्णय होणार आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया बैठकीत शिक्षण खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, शिक्षणतज्ञ आणि खासगी शाळांच्या संघटना सहभागी होणार आहेत. राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता पहिली ते नववीपर्यंच्या परीक्षा घ्यावी की नाही याबाबत बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील नववीपर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. केवळ दहावीचे वर्ग सुरू आहेत. त्यामुळे पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा होण्याबाबत गेंधळ निर्माण झाला आहे. त्यानुसार परीक्षा होणार की नाही किंवा मूल्यमापन पद्धतीने उत्तीर्ण करण्यात येईल, याचे उत्तर सोमवारी होणाऱया बैठकीनंतर मिळणार आहे.
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पहिली ते नववीपर्यंच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातही याच पद्धतीचा निर्णय घ्यावा, असा दबाव टाकला जात आहे. गेल्या वर्षीही कोरोनामुळे परीक्षा न घेता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले होते. पण कोरोना परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्या होत्या. त्याचबरोबर पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना वगळता उर्वरित पदवी विद्यार्थ्यांनाही परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे परीक्षा घ्यावी की नाही याचा निर्णय आज होणाऱया शिक्षण खात्याच्या बैठकीत होणार आहे.
कोरोना संसर्गवाढीमुळे राज्य सरकारने यापूर्वीच राज्यातील नववीपर्यंतचे वर्ग बंद केले आहेत. त्यामुळे पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परीक्षेसंदर्भात शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी सोमवारी शिक्षण खात्याची महत्त्वाची बैठक बोलाविली आहे. दरम्यान, याबाबत चर्चा करून परीक्षा घ्यावी की नाही याबाबत निर्णय होणार आहे.









