मुंबई/प्रतिनिधी
हॉल तिकीट गोंधळामुळे आधीपासूनच चर्चेत असलेली आरोग्य विभागाची जंबो भरती परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसह विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्या नसून पुढे ढकलण्यात आल्या आहेत असं सांगून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. तसेच लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र अचानक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस यांनी, २५,२६ ला होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. मंत्री महोदयांनी फेसबुकवरून सांगितलं आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका. आदल्या दिवशी सांगितलं जातं की परीक्षा रद्द झाली. नेमकं या सरकारमध्ये काय चाललंय. परीक्षा कधीही घेतात, कधीही रद्द करतात. काहीच ताळतंत्र नाहीय. कुणाला मध्य प्रदेशात तर कुणाला उत्तर प्रदेशातलं प्रवेश पत्र मिळालंय. मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
फडणवीसांनी परीक्षा पुढे ढकलल्या त्यावरून गंभीर असा आरोप केला असून आता दलाल मार्केटमध्ये उतरले आहेत असे ते म्हणाले. दलालांकडून पाच ते दहा लाख रुपये गोळा केले जातायत असं त्यांनी म्हटलं. तसेच भरतीमध्ये घोटाळा होत असल्याचे विद्यार्थ्यांकडून फोन येत आहेत, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांचे नुकसान करायचं सुरु आहे. आता याविरोधात आम्ही आम्ही आंदोलन करू असा इशाराही फडणवीसांनी दिला.