केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी बोलाविली बैठक – 12 वी तसेच अन्य प्रवेश परीक्षांचा मुद्दा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी एक महत्त्वाची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत 12 वीची बोर्ड परीक्षा तसेच अन्य प्रवेश परीक्षांच्या आयोजनासंबंधी चर्चा होणार आहे. या बैठकीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आणि राज्य परीक्षा मंडळांचे अध्यक्ष तसेच संबंधित घटक सामील होणार आहेत. ही व्हर्च्युअल बैठक रविवारी 23 मे रोजी सकाळी 11.30 वाजता सुरू होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
राज्य सरकारचे सर्व शिक्षण मंत्री आणि सचिवांना या बैठकीत सामील होणे आणि आगामी परीक्षांसंबंधी स्वतःचे मत मांडण्याची विनंती करण्यात आली आहे. यापूर्वी शिक्षणमंत्री पोखरियाल यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर एक बैठक पार पडली आहे. ज्यात पोखरियाल यांनी सर्व राज्यांकडून सूचना मागविल्या होत्या. शिक्षणमंत्र्यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेकडूनही सूचना मागविल्या आहेत.
शालेय शिक्षण तसेच साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय आणि सीबीएसई विद्यार्थ्यांसह शिक्षकांची सुरक्षा विचारात घेत परीक्षा घेण्याच्या पर्यायांवर विचार सुरू आहे. उच्च शिक्षण विभाग देखील शिक्षण संस्थांमध्ये परीक्षेची तारीख निश्चित करण्यासाठी विचारविनिमय करत असल्याचे पोखरियाल यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
देशात एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात कोरोनाची दुसरी लाट उद्भवल्यावर बोर्ड परीक्षांसह अन्य स्पर्धा परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. तसेच सीबीएसईने 10 वीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर गुण देण्याचा निर्णय घेतला आहे.
12 वी मुख्य विषयांच्या परीक्षेचा पर्याय
कोरोनामुळे परीक्षा न देऊ शकणाऱयांना आणखीन एक संधी
कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेदरम्यान सीबीएसई 12 वीच्या वर्गासाठी मुख्य विषय म्हणजेच मेजर सब्जेक्ट्सची परीक्षा घेण्याचा विचार करत आहे. 12 वीकरता मुख्य विषयांची परीक्षा घेत उर्वरित विषयांच्या गुणांकनासाठी अन्य सूत्र अवलंबिण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच कोरोनामुळे परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना आणखीन एक संधी देण्याचा विचार आहे. सरकारने कोरोनाची दुसरी लाट पाहता 12 वी बोर्ड परीक्षा टाळली होती.
174 विषय, 20 मुख्य
सीबीएसई 12 वीच्या वर्गात 174 विषयांचे शिक्षण उपलब्ध करते. यातील केवळ 20 विषय मुख्य मानले जातात. यात फिजिक्स, केमिस्ट्री, गणित, बायोलॉजी, इतिहास, राजशास्त्र, बिझनेस स्टडीज, अकौंटन्सी, जियोग्राफी, अर्थशास्त्र आणि इंग्रजी सामील आहे. सीबीएसईचा विद्यार्थी किमान 5 आणि कमाल 6 विषयांची निवड करतो, सर्वसाधारणपणे यात 4 मुख्य विषयक असतात.
परीक्षेवरून दोन पर्याय
पहिला ः केवळ मुख्य विषयांची परीक्षा निर्धारित केंद्रांवर घेतली जाऊ शकते. या विषयांमधील गुणांच्या आधारावर अन्य विषयांमध्येही गुण दिले जाऊ शकतात. या पर्यायाच्या अंतर्गत परीक्षा घेण्यासाठी पूर्व परीक्षेसाठी 1 महिना, परीक्षा आणि निकाल जाहीर करण्यासाठी 2 महिने आणि कंपार्टमेंट एक्झामसाठी 45 दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच सीबीएसईकडे 3 महिन्यांची मुदत असेल तरच हा पर्याय स्वीकारला जाणार आहे.
दुसरा ः सर्व विषयांच्या परीक्षेसाठी दीड तासाचा वेळ निर्धारित करण्याची सूचना आहे. याचबरोबर प्रश्नपत्रिकेत केवळ ऑब्जेक्टिव्ह किंवा छोटे प्रश्न विचारण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशाप्रकारे 45 दिवसांतच परीक्षा पार पाडली जाऊ शकते. 12 वीच्या मुलांच्या मुख्य विषयांची परीक्षा त्यांच्याच शाळेत घेतली जावी. तसेच परीक्षा केंद्रांची संख्या वाढवून दुप्पट करण्यात यावी.
निवडलेल्या विषयांचे 3 अन् भाषेचा एक पेपर
12 वीच्या परीक्षेत एक प्रश्नपत्रिका भाषेशी संबंधित तर 3 निवडलेल्या विषयांच्या असाव्यात. 5 व्या आणि 6 व्या विषयात मिळालेले गुण निवडलेल्या विषयातील गुणाच्या आधारावर देण्यात यावेत अशी सूचना प्राप्त झाली आहे. बोर्डाने दुसरा पर्याय निवडल्यास 2 टप्प्यांमध्ये परीक्षा होऊ शकते.









