पंतप्रधान मोदींचा सपवर शाब्दिक वार : परिवारवादी देशाच्या कल्याणाचा करू शकत नाहीत विचार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बस्ती येथील जाहीर सभेला संबोधित करताना युक्रेनसंबंधी भाष्य केले आहे. युक्रेनवर आमच्या सरकारची पूर्ण नजर आहे. भारतीयांना ऑपरेशन गंगा अंतर्गत आम्ही परत आणत आहोत. युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या आमच्या मुलामुलींना मायदेशी परत आणले जाणार आहे. भारत सरकार त्यांच्यासाठी दिवसरात्र काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परिवारवादी लोक कधीच देशाच्या कल्याणाचा विचार करू शकत नाहीत. राष्ट्रभक्ती आणि परिवारभक्तीत फरक असतो असे म्हणत त्यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला लक्ष्य केले. पंतप्रधानांनी रविवारी उत्तरप्रदेशात तीन प्रचारसभा घेतल्या आहेत. बस्ती, देवरिया आणि वाराणसीत त्यांनी भाजपसाठी प्रचार केला आहे.
परिवारवादी सरकारमध्ये असताना त्यांनी उत्तरप्रदेशची लूट केली होती. या परिवारवाद्यांच्या सरकारच्या 5 वर्षांचा हिशेब करण्यात आल्यावर हजारो कोटय़वधी रुपयांचा कुठलाच हिशेब नसल्याचे समोर आले. बनावट कंपन्या तयार करून शासकीय कंत्राटे देण्यात आली. परंतु गरीबांच्या शापामुळे 2014 मध्ये परिवारवाद्यांना झटका बसला, 2017 मध्ये त्यांना सत्ता गमवावी लागली आणि 2019 मध्ये त्यांचे अस्तित्वच संकटात सापडले आणि आता 2022 मध्ये आता त्यांना स्वतःची जागा वाचविणेही अवघड ठरल्याचे मोदी म्हणाले.
आम्ही गरीबांना 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार देतो. कोरोनाची लस मोफत देत आहोत. माझ्यासाठी या देशाचा प्रत्येक नागरिक एक समान आहे. कुठल्याही भेदभावाशिवाय, पक्षपाताशिवाय सरकार प्रत्येक गरीबाचा पक्के छत देते, हाच सर्वांचा विकास आहे. परंतु परिवारवाद्यांसाठी स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा विकासच सर्वोपरि असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
शेतकऱयांना केली मदत
ऊस उत्पादक आणि विणकरांना या परिवारवाद्यांनी बेहाल केले होते. योगी सरकारने साखर कारखान्यांची भेट उत्तरप्रदेशला दिली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या काळात अनेक नवे साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात येत आहे. देशात ऊस उत्पादकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी इथेनॉल ब्लेंडिंगचे काम वेगाने पुढे नेले जात आहे. ओडीओपीद्वारे विणकर, कारागिरांना भाजप सरकार नवा विश्वास देत आहे. विणकरांच्या सामग्रीला मोठय़ा बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वेमध्ये विशेष सुविधा असतील असे मोदी म्हणाले.
गुन्हेगारांवर वचक
आमचे सरकार पाण्याचा पूर आणि अवैध कब्जाचा पूर दोन्ही रोखण्याचे काम करत आहे. आता कुठलाच गुन्हेगार गरीबाच्या घराच्या दिशेने डोळे वर करून पाहु शकणार नाही अशी व्यवस्था भाजप सरकार निर्माण करत आहे. गोरखपूरमधील बंद पडलेला खत कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार म्हणून योगी आदित्यनाथ यांनी प्रचंड मेहनत घेतली, परंतु परिवारवाद्यांनी हे काम होऊ दिले नव्हते. परंतु आता गोरखपूरपमधील खत प्रकल्प शेतकऱयांच्या अडचणी कमी करत असल्याचा दावा मोदींनी केला आहे.









