प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना व लॉकडाऊनमुळे परिवहन मंडळाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पुढील सहा महिने परिवहन मंडळाच्या बसना टोल सवलत द्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लक्ष्मण सवदी व नितीन गडकरी यांची चर्चा झाली. लॉकडाऊनमुळे परिवहन मंडळाला कसा फटका बसला आहे. याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. या संकटातून सावरण्यासाठी परिवहन मंडळाला टोल सवलत देण्याची गरज आहे हे ठासून सांगितले.
बीएमटीसी, केएसआरटीसी, वायव्य व इशान्य परिवहन संकटात आहेत. कर्मचाऱयांचे पगार करणेही कठीण होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांनी केली. या मागणीवर विचार करून प्राधान्य क्रमाने निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ, डॉ. रजनीश गोयल, गौरव गुप्ता आदी उपस्थित होते.









