प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात असलेल्या कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने तोटय़ातही बससेवा सुरू ठेवली आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून परिवहन कर्मचारी वंचित आहेत. याविषयी परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी हतबलता व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी परिवहन कर्मचाऱयांचे तीन महिन्यांचे वेतन देण्याची घोषणा केली आहे. वेतनाकरिता 634 कोटी 50 लाख रुपये तातडीने मंजूर करण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱयांना दिली आहे.
उपमुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची बेंगळूरमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी परिवहन कर्मचाऱयांची तीन महिन्यांचे वेतन थकीत असून 634.50 कोटी रुपये मंजूर करावेत, अशी विनंती केली. या विनंतीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यांचे वेतन मंजूर करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱयांना दिला. त्यामुळे परिवहन कर्मचाऱयांना राज्य सरकारकडून तीन महिन्यांच्या वेतनातील 75 टक्के रक्कम मिळणार आहे. उर्वरित 25 टक्के रक्कम परिवहन महामंडळ आपल्या उत्पन्नातून देणार आहे.









