प्रतिनिधी / बेळगाव :
कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. याला परिवहन मंडळदेखील अपवाद नाही. कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिवहन मंडळ आर्थिक संकटात सापडले आहे. परिणामी कर्मचाऱयांना जून महिन्याच्या वेतनापासून वंचित राहावे लागले आहे. कोरोना परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या परिवहन मंडळाला आता राज्य सरकारने 961 कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 461 कोटी रुपये केवळ कर्मचाऱयांच्या वेतनासाठी मंजूर झाले आहेत. त्यामुळे वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱयांना दिलासा मिळाला आहे.
लॉकडाऊनमुळे मध्यंतरी परिवहन मंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस बराच काळ बंद होत्या. त्यातच आता प्रवाशांची संख्या रोडावल्याने परिवहनला दररोज कोटय़वधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे दररोजच्या महसुलावर परिणाम होऊन उत्पन्नही थांबले आहे. त्यामुळे खात्याला कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठी निधीची कमतरता जाणवत आहे. सर्वच कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत होते. अखेर कर्मचाऱयांच्या वेतनासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
सर्व निगम-महामंडळांमध्ये 1 लाख 20 हजार कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱयांना अद्याप जून महिन्याचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे परिवहन मंडळाचे कर्मचारी चिंतेत होते. यापूर्वी एप्रिल महिन्याचे वेतनदेखील उशिराने झाले होते. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या वेतनाला राज्य सरकारने संमती दिली होती.









