बससेवा ठप्प, परिवहनला फटका, प्रवाशांचे हाल
बेळगाव / प्रतिनिधी
वेतनवाढ, सरकारी कर्मचाऱयांचा दर्जा देण्यासह इतर मागण्यांसाठी परिवहनच्या कर्मचाऱयांनी पुकारलेला संप दुसऱया दिवशीही सुरूच ठेवला आहे. विविध मागण्यांसाठी आक्रमक व संतप्त झालेल्या कर्मचाऱयांनी शनिवारी बसस्थानकात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत तीव्र निषेध नोंदविला. परिणामी दुसऱया दिवशीही बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. शुक्रवारी कर्मचाऱयांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे बसगाडय़ा बसस्थानकात थांबून होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. हे आंदोलन सुरूच राहिल्याने बेळगाव विभागाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.
बेंगळूर परिवहनच्या कर्मचाऱयांनी आंदोलन छेडले. याला प्रतिसाद देत बेळगाव आगारात आंदोलन सुरू आहे. परिवहन कर्मचाऱयांना सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, सरकारी नोकराप्रमाणे सोयी-सुविधा पुरावाव्यात, यासह इतर मागण्यांसाठी कामबंद आंदोलन छेडले आहे. त्यामुळे शनिवारीही लांब पल्ल्यासह स्थानिक बस व वातानुकूलित बससेवाही ठप्प झाल्याने परिवहनच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून विविध मार्गांवर 620 हून अधिक बस धावतात. या बसच्या माध्यमातून परिवहनला दररोज 20 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. मात्र, दोन दिवसांपासून आंदोलन सुरू असल्याने एकही बस आगारातून बाहेर पडली नाही. त्यामुळे परिवहनला मागील दोन दिवसात जवळ जवळ 40 लाख रुपयांचा फटका बसला आहे. आधीच कोरोनामुळे परिवहनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे परिवहनच्या तोटय़ात भर पडली आहे.
परिवहन कर्मचाऱयांनी पुकारलेला संप मागे घ्यावा, सुरळीत बससेवा सुरू करावी अशी मागणी मुख्यमंत्री येडियुराप्पा व परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली आहे. मात्र आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही संप मागे घेण्यार नाही, या आक्रमक पवित्र्यात कर्मचारी आहेत. त्यामुळे हे आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. परिणामी प्रवाशांची मात्र चांगलीच गैरसोय होताना दिसत आहे. काही गावांना खासगी वाहनांची सोय नाही, अशा प्रवाशांचे हाल होत आहेत.
विविध मागण्यांसाठी परिवहनच्या कर्मचाऱयांनी शुक्रवारपासून बसस्थानकात कामबंद आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेल्या एका केएसआरटीसीच्या कर्मचाऱयांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दत्ता मंडोळकर (वय 58, रा. वडगाव) असे त्यांचे नाव असून आंदोलनात सहभागी होऊन ते रात्री घरी परतले होते. रात्री उशिराने त्यांचा घरीच हृदयविकाराच्या झटक्मयाने मृत्यू झाला. बेळगाव विभागातील 2 नंबर आगारामध्ये बसचालक म्हणून ते कार्यरत होते.
विविध मागण्यांसाठी परिवहन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन छेडले आहे. दुसऱया दिवशी शनिवारी कर्मचारी आक्रमक झाल्याने आंदोलन तीव्र झाले आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते. त्यामुळे रविवारीदेखील बस बंद राहणार आहेत.









