ग्रामीण भागातील विद्यार्थी अडचणीत : वाहनात कोंबून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ : खासगी वाहनचालकांची मनमानी
प्रतिनिधी / बेळगाव
परिवहन कर्मचाऱयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 7 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. परंतु यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे प्रशासन सामाजिक अंतर राखण्यासाठी निर्बंध घालून देत असताना दुसरीकडे मात्र एकाच वाहनात कोंबून वाहनांमधून जीव मुठीत घेऊन प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे या प्रवाशांचे कोणालाच सोयरसुतक नाही का, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
राज्यातील परिवहन कर्मचाऱयांनी पगार वाढीसह इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. संप पुकारल्यानंतर सरकार व कर्मचारी संघटनांमध्ये बैठका होऊनदेखील अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. यामुळे परिवहन व्यवस्था केव्हा सुरळीत होईल याची शाश्वती नाही. परिवहन कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सरकारदेखील नमते घेण्यास तयार नसल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी परिवहन कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय विविधप्रकारे आंदोलन करीत आहेत. सरकारकडूनही कामावर रुजू व्हा अन्यथा निलंबन केले जाईल, अशा कठोर शब्दात आदेश देण्यात आले आहेत.
परिवहनच्या संपामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. ज्या गावांमध्ये टेंपो व इतर वाहनांची व्यवस्था आहे त्या ठिकाणी काही प्रमाणात वाहतूक सुरू आहे. परंतु इतर गावांतील नागरिकांना पायपीट करत वाहतूक सुरू असलेले गाव गाठावे लागत आहे. एप्रिल व मे महिना हा लग्न सराईचा महिना असल्याने खरेदीसाठी ग्रामीण भागातून नागरिक शहरात येतात. परंतु बस बंद असल्याने त्यांनाही याचा फटका बसत आहे. खासगी वाहन चालक अव्वाच्या सव्वा दर लावून प्रवाशांची लूट करत असल्याचे प्रकारही समोर येत आहेत.
विद्यार्थ्यांचे होताहेत हाल
आधीच मागील वर्षभरापासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर काही प्रमाणात ऑफलाईन क्लासेस सुरू झाले होते. परंतु आता पुन्हा बस बंदमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. काही कॉलेज तसेच शाळांमध्ये दहावी व बारावीसाठी क्लास घेण्यात येत असल्याने विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत आहेत. यामुळे दररोज पैसे खर्च करून खासगी वाहनांनी कॉलेजपर्यंत पोहचावे लागत असल्याने विद्यार्थी व पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
तासन्तास वाहनांची पाहावी लागते वाट
परिवहनच्या बसेस बंद असल्याने खासगी वाहनचालकांची मनमानी सुरू आहे. जोपर्यंत प्रवासी पूर्ण क्षमतेने भरणार नाहीत तोवर वाहने सोडली जात नसल्याने नागरिकांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे. धर्मवीर संभाजी चौक, राणी चन्नम्मा चौक, यंदे खूट येथील कॅन्टोन्मेंट बसस्टॉप परिसरात वाहनांची वाट पाहात असलेले प्रवासी दृष्टीस पडत आहेत. त्यामुळे एकदाचा हा संप मिटवून परिवहन व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी होत आहे.









