बेमुदत संप सुरूच : आज पुन्हा बैठक होणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
वेतनवाढ, सरकारी कर्मचाऱयांचा दर्जा देण्यासह विविध मागण्यांसाठी संप पुकारलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी परिवहन कर्मचाऱयांशी चर्चा केली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे परिवहन कर्मचाऱयांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, शनिवारी पुन्हा एकदा लक्ष्मण सवदी बैठक घेणार आहेत.
सरकारी कर्मचाऱयांना असणारा दर्जा देण्यासह अनेक मागण्यांसाठी गुरुवारी परिवहन कर्मचाऱयांनी बेंगळुरात आंदोलन छेडले होते. तर शुक्रवारी बससेवा बंद ठेवून बस आगारामध्ये आंदोलन छेडले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. तर सरकारचे धाबे दणाणले. हसिरु सेनेचे अध्यक्ष कोडिहळ्ळी चंद्रशेखर, एआयटीयुसीचे नेते अनंत सुब्बाराव व इतर संघटनांच्या नैतिक पाठिंब्यामुळे परिवहन कर्मचाऱयांचे आंदोलन आणखी तीव्र झाले आहे.
परिवहन कर्मचाऱयांच्या मागण्यांसदर्भात परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी परिवहनच्या चारीही निगममधील कर्मचारी संघटनांशी चर्चा केली. एआयटीयुसीचे नेते अनंत सुब्बाराव, सीआयटीयुचे नेते प्रकाश, परिवहन मंडळाचे प्रतिनिधी, भारतीय मजदूर संघटनेचे पुंजा, केएसआरटीसीचे अध्यक्ष चंद्रप्पा, बीएमटीसीचे अध्यक्ष नंदीश रेड्डी यांच्याशीही परिवहन मंत्र्यांनी चर्चा केली. मात्र, बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही.
बैठकीनंतर लक्ष्मण सवदी यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेऊन परिवहन कर्मचाऱयांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. तत्पुर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, परिवहन कर्मचाऱयांच्या मागण्यांबद्दल सरकारला सहानुभूती आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पहिल्या टप्प्यात बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास पुन्हा चर्चा करून समझोत्याने तोडगा काढण्यात येईल. अचानक संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. त्यामुळे संप मागे घेऊन कर्मचाऱयांनी सेवेत हजर व्हावे, अशी विनंती सवदी यांनी केली.
सरकारी कर्मचारीपदाचा दर्जा देणे अशक्य
सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे परिवहन कर्मचाऱयांना सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा देणे शक्य नाही. कोरोना संकटकाळात त्यांच्या मागण्यांची पुर्तता करणे कठीण आहे. प्रत्येक कर्मचाऱयाने वस्तुस्थितीची जाणीव ठेवावी. संप मागे घेऊन सरकारला सहकार्य करा.
– येडियुराप्पा, मुख्यमंत्री









