बेळगाव / प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. याला परिवहन मंडळदेखील अपवाद नसून बेळगाव विभागाला तब्बल 110 कोटींचा फटका बसला आहे. देशात व राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढल्याने साधारण 22 मार्चपासून सर्व प्रकारची बससेवा दोन महिन्यांहून अधिककाळ बंद होती. दरम्यानच्या काळात परिवहनला हा फटका बसला आहे. त्यानंतर 19 सप्टेंबरपासून जिल्हय़ांतर्गत व राज्यांतर्गत बससेवेला प्रारंभ झाला. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद अल्पच राहिला. त्यानंतर अनलॉक चौथ्या टप्प्यात आंतरराज्य बससेवेला परवानगी मिळाली आणि गोव्यासह महाराष्ट्रात बसेस धावू लागल्या. त्यामुळे परिवहनची चाके आता हळूहळू रूळावर येताना दिसून येत आहेत.
बेळगाव विभागातील चार आगारांसह रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर या सात विभागांतून आगारातील काही बसेस जाग्यावरच थांबून होत्या. त्यामुळे परिवहनचे आर्थिक गणित कोलमडले होते. मात्र, अनलॉक-4 टप्प्यात प्रवाशांबरोबर बसफेऱयादेखील वाढल्यामुळे परिवहनच्या उत्पन्नात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे उत्पन्नात वाढ होत असली तरी निर्धारित उत्पन्न उद्दिष्टापासून परिवहन अद्याप दूरच आहे.
लॉकडाऊनपूर्वी बेळगाव विभागातून दररोज 750 बसेस धावत होत्या. त्यामुळे दररोज सुमारे 75 ते 80 लाख रुपये उत्पन्न मिळत होते. लॉकडाऊन सुरू झाले आणि सर्व बसेस जाग्यावरच थांबल्या. परिणामी उत्पन्नही शून्यावर आले. दरम्यान, कर्मचाऱयांना वेतन देणे कठीण झाले. अनलॉकच्या शिथिलतेनुसार स्थानिक बसेससह लांब पल्ल्याच्या गाडय़ा धावत आहेत. त्याचबरोबर वातानुकूलित बससेवादेखील सुरू केली आहे. बसस्थानकांतून इतर राज्यात बसेस धावत असल्याने प्रवाशांची संख्या समाधानकारक वाढत आहे. त्यामुळे उत्पन्नही वाढत आहे.
विद्यार्थी बसपासचा फटका
दरवषी विद्यार्थ्यांच्या बसपासमधून परिवहनला चांगले उत्पन्न मिळते. गतवषी 76,375 विद्यार्थ्यांनी पास काढले होते. या माध्यमातून जवळजवळ बेळगाव विभागाला 5 कोटी रुपये रक्कम मिळाली होती. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्नातही भर पडली होती. दरवषी प्राथमिक, माध्यमिक व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना परिवहन सवलतीच्या दरात बसपास वितरित करते. मात्र, यावषी कोरोनामुळे शाळा-कॉलेज बंद असल्याने एकाही विद्यार्थ्याने बसपास काढला नाही. त्यामुळे आधीच तोटय़ात सापडलेल्या परिवहनच्या नुकसानीत भर पडली आहे.









