भोगावती / प्रतिनिधी
परिते ता.करवीर गावाशेजारीच बिबट्याने चौथ्या दिवशीही ठाण मारल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. माळभागातील शेतात काही झाडावर मोर लांडोरच्या आतड्यांसह काही मांसाचे तुकडे आढळून आले आहेत. यामुळे परिते परिसरात बिबट्याचा वावर अद्याप असल्याची शक्यता असून भिती व्यक्त होत आहे. रेस्क्यु पथकाने बसविलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामधूनच बिबट्याचा नेमका ठावठिकाणा कोठे आहे ? हे समजणार आहे. त्यामुळे शेतीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.
भोगावती ते कोल्हापूर मार्गावर परिते पाटबंधारे कार्यालयाजवळ चार दिवसांपूर्वी एका पिग्मी एजंटला रात्री दहाच्या दरम्यान परिते पाटबंधारे कार्यालयाजवळ वाघ सदृष्य प्राणी दिसला होता. त्यानंतर वनविभागाने पहाणी केल्यानंतर हा वाघ नसून बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले होते.बिबट्याने परिसरात मोरांची शिकार केल्याचेही निदर्शनास आले आहे. बिबट्याच्या शोधासाठी रेस्क्यु पथकाने ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत.
सकाळी या माळभागातील शेतात काही झाडावर मांसाचे तुकडे लटकत असल्याचे ग्रामस्थांना दिसले. तसेच काही ठिकाणी पायाचे ठसे आढळल्याचे समजते. तर काल कारंडे नाळवा भागात मेंढरांना झाडांचे डहाळे आणण्या साठी गेलेल्या धनगरांना पायाचे ठसे आढळले आहेत. त्यामुळे चौथ्या दिवशीही बिबट्याने याठिकाणी ठाण मारले असल्याचे स्पष्ट झाले. माळ भागात पन्नासहुन अधिक कुटूंबांची घरे व गोठे आहेत. चार दिवसांपासुन या भागात शेतीकामासाठी भितीमुळे कोणीही फिरकले नाही. त्यामुळे भात कापणीसह,ऊसतोडणी,शेतास पाणी पाजणे आदी कामे खोळंबली आहेत. त्यामुळे वनविभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.