पुन्हा वनखात्याचे रेस्क्यू पथक येणार
प्रतिनिधी / भोगावती
परिते ता. करवीर गावाजवळ बुधवारी रात्री दिसलेला बिबट्या शुक्रवारी सकाळी वैरण आणण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याला पुन्हा आढळला आहे. त्यामुळे भोगावती परिसरातील भिती अद्यापही संपलेली नाही. त्यामुळे वनखात्याचे रेस्क्यू पथक पुन्हा परिते येथे येणार आहे.
भोगावती ते कोल्हापूर रस्ता ओलांडून डोंगराकडे गेलेला बिबट्या त्याच परिसरात असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. कारण आज सकाळी ढेरे यांच्या शेताकडे वैरणीसाठी दिगंबर सुतार रा. परिते हे गेले होते. त्यावेळी पाण्याच्या खणी शेजारील ऊसाच्या शेतात कडेच्या सरीत हा बिबट्या बसला असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे वैरण न घेताच ते सरळ घराकडे परतले आहेत. तसेच त्या भागातील शेतकरी बि. के. डोंगळे रा. घोटवडे यांच्या शेततळ्यातील प्लास्टिक काळ्या कागदावर बिबट्याच्या पायाचे अनेक ठसे आढळून आले आहेत.
यासंदर्भात करवीर विभागाचे वनपाल विजय पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने आज सकाळी ११ वाजता दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता आज पुन्हा परिते परिसरात वनखात्याच्या रेस्क्यू पथकाकडून तपास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परिते गावातील माळवाडी भागात गुरुवारी रात्री कुत्री एकसारखी मोठ्या प्रमाणात भुंकत होती, असे त्या भागात राहणार्या नागरिकांनी आज सांगितले.









